महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपने मुंबईसह अनेक ठिकाणी दणदणीत विजय झाला. यानंतर मुंबईच्या महापौरवरून सध्या राज्याचे राजकारण चर्चेत आले आहे. अशातच मिरा भाईंदरमध्येही महापौर हा मराठीच असावा अशी मागणी जोर धरत आहे. मिरा भाईंदरमध्ये देखील भाजपने चांगचाल विजयाचा धुरळा उडवला, त्यानंतर महापौरपदावरून 'जर मराठी महापौर बसवला नाही तर रक्ताचा सडा पडेल' असं म्हणत मराठी एकीकरण समितीने भाजपला निर्वाणीचा इशारा दिला. यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी देखील रक्ताचा सडा पडेल पण ते रक्त मराठी माणसाचे नसेल असं म्हणत मराठी एकीकरण समितीला पाठिंबा दिला. तसेच विकासकामांच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आपल्याला पाठिंबा असेल पण महाराष्ट्रात मराठीच महापौर बसवला जावा, अशीच आमच्या पक्षाची भूमिका आहे आणि हे तुम्हाला पाळावेच लागेल, असे अविनाश जाधव म्हणाले.
हेही वाचा- Samadhan Sarvankar VS BJP : 'भाजपाच्या टोळीमुळेच माझा पराभव' समाधान सरवणकरांचा भाजपवर गंभीर आरोप
यावेळेस अविनाश जाधव म्हणाले की, "यावेळी तुम्ही बहुमताने निवडून आला आहात, मात्र महानगरपालिकेच्या महापौरपदी मराठी व्यक्तीच बसली पाहिजे. भारतीय जनता पक्षामधूनही मराठी लोक विजयी झाले आहेत. त्यापैकी कुणालाही संधी द्यावी. शेवटी भूमिपुत्रांना न्याय दिला जावा. मिरा भाईंदरमध्ये भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले आहे. भारतीय जनता पक्ष स्वबळावर सत्तेत आला आहे. आता पुढच्या काही दिवसांत महापौरपदी कोण बसणार, हे निश्चित होईल. असे असताना जर मिरा भाईंदरमध्ये अमराठी व्यक्ती महापौरपदी बसला तर रक्ताचा सडा पडेल, मात्र हे रक्त मराठी माणसाचे नसेल. मिरा भाईंदरमध्ये महापौरपदी मराठी माणूसच बसला पाहिजे. जर कुणी वेगळा विचार केला तर संयुक्त महाराष्ट्राचा लढा ज्या पद्धतीने लढला गेला, तसाच लढा आम्हीही लढू." अशी मनसेची भूमिका असल्याचे अविनाश जाधव म्हणाले.