मुंबई: 2014 च्या विधानसभा आणि 2017 च्या महापालिका निवडणुकीदरम्यान युतीसाठी मनसेने शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे प्रस्ताव पाठवले होते. मात्र, त्यांनी फक्त चर्चेचे गुऱ्हाळ सुरू ठेवत आमचा विश्वासघात केला होता. त्यामुळे आता उद्धवसेनेला मनसेसोबत युती करायची असेल तर त्यांनी अध्यक्ष राज ठाकरे यांना योग्य प्रस्ताव पाठवावा', असे आवाहन मनसे नेते संदीप देशपांडेंनी दिले आहे.
हेही वाचा: 'विवाहितेला विष पाजून...'; सोलापुरात विवाहितेला काठी आणि रॉडने मारहाण
ठाकरे बंधूंच्या युतीवर बोलताना शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते आणि आमदार अनिल परब म्हणाले की, 'मनसेसोबत युती करण्याच्या निर्णयावर आम्ही सकारात्मक असून, राज ठाकरे यांनी योग्य निर्णय घ्यावा'. यावर मनसे नेते संदीप देशपांडेंनी अनिल परब यांना प्रत्युत्तर देत म्हणाले की, 'गेल्या वेळी त्यांनी विश्वासघात केला होता. त्यामुळे आता त्यांच्याकडून युतीबाबतचा ठोस प्रस्ताव यावा, अशी अपेक्षा आहे. युतीबाबत राज ठाकरे योग्य वेळी निर्णय घेतील. महाराष्ट्राच्या हितासाठी युती करण्यास कुणी इच्छुक असेल तर त्यावर विचार करू, युती झाली पाहिजे, असे राज ठाकरे यांनी म्हटले नव्हते'.