दहिसर: दहिसर विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक लक्षवेधी फलक झळकला आहे. 'कुठे गेले मराठी अभिमानाचे चेहरे?' असा सवाल करणारा हा फलक मनसेचे पदाधिकारी किरण नकाशे यांनी लावला असून, राज्यातील हिंदी सक्तीच्या विरोधातील आंदोलनाचा भाग आहे. या फलकावर 'मराठीच्या गळचेपीविरोधात फक्त मनसेचं लढतेय' असा ठाम संदेश देण्यात आला आहे.
या वादाची पार्श्वभूमी अशी की, महाराष्ट्र शासनाने नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत 2024 च्या राज्य पाठ्यक्रम संरचनेत मोठा बदल केला आहे. मराठी आणि इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये इयत्ता 1 ली ते 5 वी पर्यंत हिंदी ही अनिवार्य तिसरी भाषा असेल, असा नियम लागू करण्यात आला आहे. विद्यार्थी अन्य भारतीय भाषा निवडू शकतात, परंतु त्या वर्गात किमान 20 विद्यार्थ्यांची ती भाषा शिकण्याची मागणी असावी, अशी अट आहे. शिक्षक उपलब्ध नसल्यास ही भाषा ऑनलाइन शिकवली जाईल.
हेही वाचा:Pandharpur Wari 2025 Wishes: खास शुभेच्छा, प्रेरणादायी कोट्स आणि महत्वाची माहिती
या धोरणामुळे मराठी भाषेच्या अस्तित्वावर आणि ओळखीवर संकट निर्माण झाल्याचा आरोप मनसे करत आहे. सणासुदीला 'मराठीपण' साजरे करणारे कलाकार, राजकारणी आणि सेलिब्रिटी आज गप्प का आहेत, असा थेट सवाल फलकावरून विचारण्यात आला आहे. मराठीसाठी सातत्याने आणि सच्च्या मनाने लढण्याची ही वेळ असल्याचा मनसेचा संदेश आहे.