मुंबई: राज्यात पहिलीपासूनच तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीने शिकवावी लागणार असल्याचा शासन निर्णय शिक्षण विभागाने घेतल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक पवित्रा घेतला आहे. या निर्णयाविरोधात राज्यभरात फलकबाजी करत मनसेने सरकारचा तीव्र निषेध नोंदवला आहे.
या निर्णयानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर सडकून टीका केली. त्यानंतर लगेचच पक्षाकडून वडाळ्यात सर्वप्रथम फलकबाजी करण्यात आली. 'काय सालं सरकार आहे?' असा सवाल विचारत, 'परप्रांतीयांना मराठी शिकवण्याऐवजी मराठी माणसालाच हिंदी शिकायला लावणं' हा निर्णय चुकीचा असल्याचं स्पष्टपणे फलकांवर नमूद करण्यात आलं आहे.
हेही वाचा: ठाण्यात उद्धव ठाकरेंना डिवचणारे बॅनर झळकले
मनसेने वडाळ्यातून सुरुवात करत दादर परिसरातही हे फलक लावले आहेत. फलकावरून सरकारच्या निर्णयावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं असून, मराठी माणसाला विचार करायला लावणारी ही सक्ती असल्याचं मनसेचं म्हणणं आहे. हिंदी भाषा थोपवली जात असल्याचा आरोप करत, या निर्णयामुळे राज्यातील मातृभाषेचा अवमान होत असल्याचा मनसेचा आक्षेप आहे.
या फलकांमधून ‘हिंदीला कडाडून विरोध’ करण्यात आला असून, राज ठाकरेंच्या आदेशानंतर हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या निर्णयावरून मनसे पुन्हा एकदा रस्त्यावर उतरली आहे.