Saturday, March 07, 2026 05:08:11 AM

Latur ZP Result 2026 : लातूरमध्ये मनसेचा 'इंजिन' सुस्साट; राज ठाकरेंच्या शिलेदारांनी उधळला विजयाचा गुलाल

लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत मनसेने जोरदार मुसंडी मारली असून रेणापूर तालुक्यात आपले खाते उघडले आहे.

latur zp result 2026  लातूरमध्ये मनसेचा इंजिन सुस्साट राज ठाकरेंच्या शिलेदारांनी उधळला विजयाचा गुलाल

Latur ZP Result 2026 : मराठवाड्याच्या राजकारणात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत मनसेने जोरदार मुसंडी मारली असून रेणापूर तालुक्यात आपले खाते उघडले आहे. या विजयामुळे लातूरच्या राजकीय वर्तुळात मनसे कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आहे. विशेषतः प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या पानगाव जिल्हा परिषद गटातून मनसेचे उमेदवार डॉ. सुनील नागरगोजे यांनी विजय मिळवत इतिहास रचला आहे.

पंचायत समितीवरही मनसेचा झेंडा 
केवळ जिल्हा परिषदच नव्हे, तर पंचायत समितीवरही मनसेने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. रेणापूर तालुक्यातील कोस्टगाव गण मधून मनसेच्या श्रीदेवी गालफाडे विजयी झाल्या आहेत, तर पानगाव गण मधून मनसेच्या मोनिका रवी सूर्यवंशी यांनी बाजी मारली आहे. या विजयामुळे मनसेने स्थानिक पातळीवर आपली पकड मजबूत असल्याचे दाखवून दिले आहे.

हेही वाचा - Kolhapur ZP Panchayat Samiti Result 2026: कोल्हापुरात सतेज पाटलांचा करिष्मा? 40 जागांचे कल हाती; काँग्रेसने मारली मोठी मुसंडी, वाचा संपूर्ण निकाल

गेल्या 3 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांवर सुरू असलेले प्रशासक राज आज संपुष्टात येत आहे. 7 फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदानानंतर आज सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. लातूर जिल्ह्यातील 59 जिल्हा परिषद आणि 118 पंचायत समिती जागांसाठी चुरशीची लढत झाली. या निवडणुकीत राजकीय नेत्यांच्या सभा आणि सोशल मीडियावरील आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण चांगलेच तापले होते, मात्र अखेर 'मिनी मंत्रालयाचा' कौल स्पष्ट झाला आहे.

मतमोजणीची महत्त्वाची आकडेवारी 
लातूर जिल्ह्यात या निवडणुकीसाठी एकूण 63.79 टक्के म्हणजेच 9,51,235 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील 10 तालुक्यांमध्ये एकूण 142 टेबलवर EVM ची मोजणी सुरू आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी 1,291 कर्मचारी तैनात करण्यात आले असून सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. लातूरमध्ये काँग्रेस आणि भाजपसारख्या बलाढ्य पक्षांना टक्कर देत मनसेने मिळवलेला हा विजय आगामी राजकारणाची दिशा बदलणारा ठरू शकतो.
 


सम्बन्धित सामग्री