नागपूर: महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध शहरांमध्ये लोकशाहीच्या या महत्त्वाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून, मतदारांमध्ये मतदानाबाबत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज सकाळी नागपूरमधील महल परिसरातील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी नागरिकांना मतदानाचे महत्त्व अधोरेखित करत संदेश दिला.
हेही वाचा: Thane Mahanagar Palika : तुमच्या प्रभागात कोण उमेदवार? ठाणे महापालिका निवडणुकीतील उमेदवारांची यादी वाचा सविस्तर
यावेळी बोलताना डॉ. मोहन भागवत म्हणाले की, मतदान हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क असून, तेवढेच महत्त्वाचे कर्तव्यही आहे. विचारपूर्वक आणि जबाबदारीने योग्य उमेदवाराची निवड करणे हे मतदानाच्या दिवशी नागरिकांचे पहिले कर्तव्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
नागरिकांनी मतदानासाठी घराबाहेर पडावे, असे आवाहन भारतीय निवडणूक आयोग सातत्याने करत असतो आणि हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.
नोटा (NOTA) या पर्यायासंदर्भात भाष्य करताना डॉ. भागवत म्हणाले की, नोटा हा पर्याय नागरिकांच्या उमेदवार निवडीच्या वैतागण्याला दिलेला पर्याय असू शकतो. मात्र, त्याऐवजी उपलब्ध उमेदवारांपैकी विचार करून योग्य व्यक्तीची निवड करणे अधिक महत्त्वाचे आहे. “अराजक म्हणजे राजा नसणे,” असा उल्लेख महाभारतात असल्याचा दाखलाही त्यांनी यावेळी दिला.
एकूणच, मतदान प्रक्रियेला सुरुवात झाल्याने राज्यभरात लोकशाहीचा उत्सव साजरा होत असून, आजच्या मतदानाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: BMC Election 2026: मुंबई महापालिकेचा कौल मतदारराजाच्या हाती! मुंबईच्या महापालिकेसाठी 'काऊंटडाऊन' सुरू