Thursday, July 17, 2025 02:48:01 AM

MSRTC: लांब आणि मध्यम पल्ल्याच्या एसटी प्रवासात आता मिळणार 15% सवलत; सरनाईक यांचा महत्त्वाचा निर्णय

एसटीने प्रवासी संख्या वाढवण्यासाठी लांब व मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्यांना १५% सवलतीचा निर्णय घेतला असून सामान्य प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.

msrtc लांब आणि मध्यम पल्ल्याच्या एसटी प्रवासात आता मिळणार 15 सवलत सरनाईक यांचा महत्त्वाचा निर्णय

MSRTC Offers Discount: राज्य परिवहन विभागाने एसटी महामंडळाच्या प्रवासी संख्येत वाढ करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरात 15 टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. हा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला असून, सर्वसामान्य प्रवाशांसाठी हा निर्णय मोठा दिलासा ठरणार आहे.

राज्यभरात अनेक नागरिक एसटीच्या लांब पल्ल्याच्या सेवा वापरतात. मात्र खासगी वाहतुकीच्या स्पर्धेमुळे एसटीकडे प्रवाशांची संख्या कमी होत चालली होती. हीच बाब लक्षात घेऊन एसटी महामंडळाने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी सवलतीची योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: NEET MDS 2025: राज्य कोट्यात प्रवेशासाठी CET कडून अर्जप्रक्रिया सुरू

या निर्णयाअंतर्गत, जे प्रवासी आगाऊ आरक्षण करून पूर्ण तिकीट देतात, त्यांना तिकीट दरात सुमारे 10 ते 15 टक्क्यांपर्यंत सवलत मिळू शकते. यामुळे प्रवाशांना आर्थिक फायदा होईल आणि एसटी सेवांकडे पुन्हा एकदा लोकांचा ओढा वाढेल, अशी अपेक्षा परिवहन विभागाने व्यक्त केली आहे.

या सवलतीचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांनी एसटीची अधिकृत वेबसाइट किंवा जवळच्या एसटी आरक्षण केंद्रातून आगाऊ तिकिटे बुक करावी लागतील. सवलतीचा तपशील, अटी व नियम लवकरच अधिकृत पद्धतीने जाहीर करण्यात येतील.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले की, 'सवलतीमुळे प्रवाशांचा खर्च कमी होईल आणि एसटीच्या सेवा अधिक लोकांपर्यंत पोहोचतील. एसटी ही सामान्य माणसाची वाहतूक व्यवस्था आहे आणि ती अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.'


सम्बन्धित सामग्री