Ladki Bahin Yojana E-KYC : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने चालवलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना जारी केली आहे. या योजनेतून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची रक्कम दिली जाते. या योजनेचा लाभ केवळ योग्य महिलांना मिळावा यासाठी केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. केवायसी करण्याची मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवून देण्यात आली आहे. यासोबतच, केवायसी करताना काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी विभागाने एक संधी दिली आहे.
केवायसी दुरुस्तीसाठी अंतिम संधी
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 1 कोटी 74 लाख महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. आता विभागाने अशा लाभार्थी महिलांना त्यांच्या केवायसीमध्ये पर्याय निवडताना झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी योजनेच्या संकेतस्थळावर अंतिम संधी दिली आहे. त्यामुळे, ज्यांच्याकडून केवायसी करताना काही चुका झाल्या असतील, त्यांनी दुरुस्ती करताना काळजीपूर्वक माहिती भरावी.
हेही वाचा - Navi Mumbai Water Cut: नवी मुंबईकरांवर पाणीटंचाईचं संकट; आठवड्यातून दोन दिवस पाणी पुरवठा राहणार बंद
एकल महिलांसाठी विशेष सूचना
महिला व बालविकास विभागाने केवायसी प्रक्रिया सुरू केली तेव्हा ज्या लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत, तसेच एकल महिलांनी केवायसी कशी पूर्ण करावी, असा प्रश्न निर्माण झाला होता. याचे कारण म्हणजे केवायसी पूर्ण करण्यासाठी वडील आणि पतीच्या आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण करणे अनिवार्य होते. विभागाने आता याबाबत निर्णय घेतला आहे.
ऑफलाईन कागदपत्रे आणि अंतिम मुदत
वडील किंवा पती हयात नसणाऱ्या महिलांनी त्यांच्या पती अथवा वडील यांच्या मृत्यू प्रमाणपत्राची प्रत 31 डिसेंबरपर्यंत अंगणवाडी सेविकांकडे जमा करायची आहे. त्याचप्रमाणे, घटस्फोटित महिलांनी घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयीन आदेशाची प्रत अंगणवाडी सेविकांकडे द्यावी. ही प्रक्रिया ऑफलाईन (Offline KYC) असेल. अशा महिलांनी आपला आधार क्रमांक संकेतस्थळावर नोंदवून स्वतःची केवायसी पूर्ण करून घेणे आवश्यक आहे. दरम्यान, योजनेच्या लाभार्थी महिलांना नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार, याची प्रतीक्षा आहे.
हेही वाचा - Pune MHADA Lottery 2025: घर खरेदीसाठी पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 4186 घरांची सोडत अंतिम टप्प्यात