मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत 30 मजली भव्य ‘बिहार भवन’ उभारण्याच्या मुद्द्यावरून सध्या महाराष्ट्र आणि बिहारच्या राजकारणात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांनी नुकतेच मुंबईत बिहार भवन उभारण्याबाबत एक आक्रमक विधान केले होते. "आम्ही मुंबईत भवन बांधूनच दाखवू, कोणाच्या बापात हिंमत असेल तर रोखून दाखवा," अशा शब्दांत त्यांनी आव्हान दिले होते. त्यांच्या या विधानाचा समाचार घेताना शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी बिहार सरकारला अत्यंत मोजक्या शब्दांत पण सडेतोड उत्तर दिले आहे. "संविधान आम्हालाही कळते, पण भाषेवर संयम हवा," असा सल्ला देत राऊतांनी बिहार सरकारसमोर एक महत्त्वाची अट ठेवली आहे.
बिहारच्या मंत्र्यांनी वापरलेली भाषा आणि त्यांचा आक्रमक पवित्रा यावर संजय राऊत यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, "भारतीय संविधानाने या देशातील प्रत्येक नागरिकाला कुठेही राहण्याचा आणि काम करण्याचा अधिकार दिला आहे, हे आम्हालाही मान्य आहे. मुंबईत याआधीही अनेक राज्यांची भवने उभी आहेत आणि त्याला कुणाचाही विरोध नाही. मात्र, ज्या अरेरावीच्या भाषेत बिहारचे मंत्री आव्हान देत आहेत, ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. मुंबईत विनाकारण वातावरण बिघडवण्याचे काम त्यांनी करू नये."
हेही वाचा: Bharat Gogawale: 'भाजपावाले कधी कुणाशी युती करतील ...' ; मंत्री भरत गोगावलेंची भाजपावर थेट टीका
या वादावर तोडगा काढताना संजय राऊत यांनी ‘जशास तसे’ या न्यायाने बिहार सरकारला एक प्रस्ताव दिला आहे. ते म्हणाले, "तुम्हाला मुंबईत बिहार भवनसाठी जागा हवी असेल, तर ती इथलीच जमीन वापरावी लागेल, ती काही तुम्ही पाटण्यावरून आणणार नाही. त्यामुळे आमची एक सरळ मागणी आहे. ज्याप्रमाणे तुम्ही मुंबईत जागेची मागणी करत आहात, त्याचप्रमाणे बिहार सरकारने पाटण्यातील ‘गोला रोड’ किंवा ‘न्यू पाटलीपुत्र कॉलनी’सारख्या मोक्याच्या ठिकाणी महाराष्ट्राला पाच ते सहा एकर जागा द्यावी. तिथे आम्ही 30 माळ्यांचे भव्य ‘महाराष्ट्र भवन’ उभारू."
सांस्कृतिक देवाणघेवाणीचा मुद्दा अधोरेखित करताना राऊत पुढे म्हणाले की, ही प्रक्रिया एकतर्फी असू शकत नाही. महाराष्ट्रातील अनेक लोक बिहारमध्ये, विशेषतः पाटण्याला जातात. त्यांनाही तिथे राहण्यासाठी हक्काचे ठिकाण मिळायला हवे. "जर बिहारी बांधव आमचे असतील आणि त्यांना मुंबईत 30 मजली भवन हवे असेल, तर पाटण्यात मराठी माणसाचे स्वागत करण्याची तयारीही तुम्ही ठेवली पाहिजे. यालाच खरी सांस्कृतिक देवाणघेवाण म्हणतात आणि ती संपूर्ण देशभरात स्वीकारली गेली पाहिजे. फक्त मुंबईवरच आक्रमण का?" असा परखड सवाल त्यांनी उपस्थित केला.
राऊतांनी यावेळी जागेच्या किंमतीवरूनही बिहार सरकारला वास्तववादी आरसा दाखवला. जर बिहार सरकारला मुंबईत जागा हवी असेल, तर त्यांनी ती गौतम अदानींकडून सध्याच्या बाजारभावाने विकत घ्यावी. आणि जर सरकारकडून सवलतीच्या दरात किंवा मोफत जागा हवी असेल, तर त्याबदल्यात आम्हाला पाटण्यात जागा द्यावी लागेल, असे गणितच त्यांनी मांडले. "आम्ही देशाचे संविधान मानणारे लोक आहोत, तुमच्यासारखे आकांत तांडव करणारे नाही," अशा शब्दांत त्यांनी मंत्र्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.
मुंबईची सध्याची अवस्था आणि जागेची कमतरता लक्षात घेता, विनाकारण राजकीय हेतूने प्रक्षोभक विधाने करून शहरातील वातावरण गढूळ करू नका, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे. बिहार भवन उभारण्याला विरोध नाही, पण तो व्यवहार दोन्ही राज्यांच्या सन्मानाचा आणि परस्परांच्या सोयीचा असावा, हीच भूमिका यातून स्पष्ट होत आहे. आता या प्रस्तावावर बिहार सरकार काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा: EU Trade Deal: भारताच्या निर्यातीला मोठा दणका! अमेरिकेनंतर युरोपनेही टॅरिफ वाढवला, व्यापार क्षेत्रात खळबळ