मुंबई: संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी आज अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या प्राथमिक कलांनुसार, भारतीय जनता पक्षाने (भाजप) मुंबईत मोठी मुसंडी मारली असून महायुती बहुमताच्या आकड्याकडे वेगाने वाटचाल करताना दिसत आहे. आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका समजल्या जाणाऱ्या बीएमसीवर आपला झेंडा फडकवण्यासाठी सर्वच पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे प्राथमिक कल आता स्पष्ट होत असून, भारतीय जनता पक्षाने (भाजप) मोठी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) अपेक्षित यश मिळताना दिसत नसले, तरी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी एक भावनिक ट्विट केले आहे.
हेही वाचा: Solapur Election Result : तुरुंगात असूनही महापालिका निवडणुकीत करिश्मा ! खुनाचा आरोप असलेल्या शालन शिंदे विजयी
निवडणुकीच्या रिंगणात जय-पराजयापेक्षाही कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत महत्त्वाची असल्याचे देशपांडे यांनी अधोरेखित केले आहे. "आज मुंबई महानगरपालिकेचे निकाल आहेत.कोण जिंकेल कोण हरेल याचा निर्णय जनता करेलच पण ज्या हिमतीने माझ्या सहकारी महाराष्ट्र सैनिकांनी ही निवडणूक लढवली,मेहनत घेतली त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन" अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांच्या संघर्षाला दाद दिली आहे.
प्राथमिक कलानुसार भाजप विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना, मनसे कार्यकर्त्यांमध्ये निराशेचे वातावरण पसरू नये यासाठी संदीप देशपांडे यांनी पुढाकार घेतला आहे. राजकारणात हार - जीत होतच असते, मात्र कार्यकर्त्यांनी आपला संयम ढळू न देता पुढच्या लढ्यासाठी सज्ज राहावे, असा संदेश त्यांच्या या भूमिकेतून मिळत आहे.
निवडणुकीचे निकाल काहीही लागोत, पण आपल्या कार्यकर्त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून त्यांना बळ देण्याची ही भूमिका मनसेसाठी भविष्यात महत्त्वाची ठरणार आहे. पराभवाच्या गर्तेत न अडकता पुन्हा उभारी घेण्याचा संदेशच जणू संदीप देशपांडे यांनी या पोस्टद्वारे दिला आहे.
हेही वाचा: BMC Election Results 2026: तेजस्विनी घोसाळकर यांचा प्रभाग 2 मध्ये विजय; विजयानंतर दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या "हा विजय ..."