Saturday, February 14, 2026 04:32:43 AM

BMC Election 2026: आज चुकलात तर कायमचे...., ठाकरे बंधूंसाठी रश्मीताई मैदानात; थेट मुंबईकरांना आवाहन

मुंबईकरांना मतदानासाठी बाहेर पडण्याची त्यांनी साद घातली. सोशल मीडियावर ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

bmc election 2026 आज चुकलात तर कायमचे ठाकरे बंधूंसाठी रश्मीताई मैदानात थेट मुंबईकरांना आवाहन

मुंबई: “मुंबई आपली आहे आणि ती आपलीच राहिली पाहिजे. जर आज आपण घरात बसून राहिलो आणि मतदानाचा हक्क बजावला नाही, तर उद्या पश्चाताप करण्याची वेळ येईल अशा आशयाने "आज चुकलात, तर कायमचे मुकलात!, आपल्या मुंबईसाठी पेटून उठा आणि मतदान करा” अशा परखड शब्दांत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी मुंबईकरांना मतदानासाठी भावनिक साद घातली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसाठी आज 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडत असून, सकाळपासूनच राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांना जागे करण्यास सुरुवात केली आहे.

मुंबईच्या राजकारणात रश्मी ठाकरे या नेहमीच पडद्यामागून सूत्रे हलवताना दिसतात. मात्र, यंदाच्या निवडणुकीत त्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून विशेषतः महिला मतदारांशी संवाद साधला आहे. “मुंबईचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि आपल्या हक्काच्या माणसाला महापालिकेत पाठवण्यासाठी प्रत्येकाने घराबाहेर पडणे गरजेचे आहे,” असे आवाहन त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केले. त्यांच्या या आवाहनाला मुंबईतील गृहिणी आणि युवा वर्गाकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, ‘माझी मुंबई, माझे मतदान’ हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसत आहे.

यंदाच्या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल 20 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. या ‘ठाकरे युती’मुळे मुंबईतील मराठी मतांचे समीकरण बदलण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. रश्मी ठाकरे यांनी “चुकलात तर मुकलात” या वाक्याचा पुनरुच्चार करत मुंबईच्या अस्मितेसाठी मतदान करण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे, सत्ताधारी महायुतीचे नेते विकासाच्या मुद्द्यावर मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा: Tejasvee Ghosalkar: "अभिषेकची साथ आहे मला..." मतदानापूर्वी पतीच्या आठवणीने तेजस्वी घोसाळकर भावूक

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, सकाळी 10 वाजेपर्यंत मुंबईतील मतदानाचा वेग काहीसा संथ होता. हा टक्का वाढवण्यासाठी आता नेत्यांनी सोशल मीडियाचा जोरदार आधार घेतला आहे. फेसबुक, ट्विटर (X) आणि व्हॉट्सॲपवर भावनिक पोस्ट, व्हिडीओ आणि आवाहनांचा अक्षरशः पूर आला आहे.

“मुंबईवर कुणाचे राज्य येणार यापेक्षा मुंबईवर कोणाचे प्रेम आहे, हे आज सिद्ध करण्याची वेळ आली आहे,” अशा पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मुंबईतील 10,231 मतदान केंद्रांवर तब्बल 64,375 शासकीय कर्मचारी तैनात करण्यात आले असून, कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, ही निवडणूक केवळ महापालिकेची नसून ती मुंबईच्या मराठी अस्मितेची आणि पुढील राजकीय दिशा ठरवणारी आहे. रश्मी ठाकरे यांनी केलेले भावनिक आवाहन थेट सर्वसामान्य मुंबईकरांच्या मनाला भिडत असल्याचे चित्र आहे. शहरातील प्रत्येक वॉर्डमध्ये चुरस वाढली असून, दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रशासनाकडूनही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून, अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा: Maharashtra Election 2026: मतदान केंद्रावर शाईऐवजी मार्करचा वापर, निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार उघडकीस


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या