मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 च्या निकालांनी राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. सत्ताधाऱ्यांनी धनशक्ती, दबावतंत्र आणि फोडाफोडीचे राजकारण वापरल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात असतानाच, ठाकरे कुटुंबीयांकडूनही तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर शर्मिला ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना थेट आणि परखड शब्दांत आपली भूमिका मांडली.
शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, “ही लढाई नेमकी कशी होती, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. या निवडणुकीत अमाप धनशक्ती लावण्यात आली. शक्य होईल ते सगळं केलं गेलं. कल्याण - डोंबिवलीतच नव्हे, तर सर्वच ठिकाणी आमचे उमेदवार, शहराध्यक्ष, शाखाप्रमुख, गटप्रमुख पळवण्याचे प्रयत्न झाले. आमच्याकडून जेवढं घेता येईल, तेवढं प्रयत्नपूर्वक घेतलं गेलं.”
त्या पुढे म्हणाल्या, “असं असूनही आम्ही ज्या पद्धतीने ही लढाई लढलो, त्याबद्दल मला आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं मनापासून कौतुक आहे. आम्ही पैशाच्या बाबतीत कमी पडलो असू, पण आमच्याकडे निष्ठावान आणि कष्टकरी कार्यकर्त्यांची जी फळी आहे, तिने उत्तुंग कामगिरी केली. म्हणूनच आज आम्ही त्यांचं औक्षण केलं.”
हेही वाचा: Pune Election Results: स्वबळाची खुमखुमी नडली, पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेचा करेक्ट कार्यक्रम; 'या' कारणांमुळे स्वीकारावा लागला पराभव
कल्याण - डोंबिवली संदर्भात बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या, “आमचे शहराध्यक्ष, शाखाप्रमुख, गटप्रमुख सगळे पळवले गेले, तरीसुद्धा आमचे पाच नगरसेवक निवडून आले. हे आमच्या कार्यकर्त्यांच्या ताकदीचं आणि जनतेच्या विश्वासाचं प्रतीक आहे.” अजित पवारांबाबत बोलताना त्यांनी तीव्र टीका केली. “अजित पवारांच्या फाइल्स अजून बंद झालेल्या नाहीत, आणि त्याच अजित पवारांना सत्तेत घेऊन बसतात. सत्तेत असताना पुरावे बाहेर काढले जात नाहीत, सत्ता गेल्यावर पुन्हा भांडायला मोकळे होतात. हे दुटप्पी राजकारण जनतेने ओळखलं आहे,” असे त्या म्हणाल्या.
‘ठाकरे ब्रँडचा बँड वाजवला’ अशा सोशल मीडिया ट्रोलिंगवर प्रतिक्रिया देताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या, “त्यांना जे बोलायचं आहे ते बोलू द्या. मी ट्रोलर्सना कधीच उत्तर देत नाही. आमचं उत्तर हे कामातून आणि संघर्षातूनच असतं.”
ठाणे महानगरपालिकेबाबत बोलताना त्यांनी आरोप केला की, “ठाणे हे एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्यामुळे आमचे अनेक उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले. तुम्ही आमचे शाखाप्रमुख, गटप्रमुख, नेते पळवता, पण तुमचे पक्ष इतके जुने असताना तुम्ही स्वतःची माणसं का तयार करू शकत नाही? आम्ही आमचे नेते घडवतो, आणि पुढेही घडवत राहू.” पक्षाच्या भविष्यातील वाटचालीबाबत त्या म्हणाल्या, “उद्यापासून आम्ही पुन्हा एकदा जोमाने पक्षबांधणीला सुरुवात करणार आहोत. आमच्याकडे पुढची फळी तयार आहे, काम करण्यासाठी तयार आहे. प्रत्येक मतासाठी 5000 किंवा 10000 रुपये देण्याच्या राजकारणाला आम्ही कधीच अर्थ देणार नाही. अशी कामं आम्हाला करायची नाहीत.”
आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “मला आदित्य आणि अमित ठाकरे यांचा अभिमान आहेच, पण त्याहीपेक्षा मला आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा अभिमान आहे. काहीच हातात नसताना त्यांनी लढा दिला, अनेक ठिकाणी जिंकून दाखवलं.” शेवटी शर्मिला ठाकरे यांनी ठाम शब्दांत स्पष्ट केले की, “उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्रच राहणार आहेत. आमचं कुटुंब कायम एकत्र राहणार आहे. ही केवळ राजकीय नव्हे, तर वैचारिक आणि कौटुंबिक एकजूट आहे.”
हेही वाचा: Maharashtra Election Result 2026: राज्यात 'कमळ' जोमाने फुलले; भाजप नंबर एक, तर शिंदेंची शिवसेना दुसऱ्या स्थानी; वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर