Friday, February 13, 2026 12:59:34 AM

Mumbai Road Update: सायन, कांदिवली, मालाडकरांसाठी 'ट्रॅफिक ॲडव्हायजरी' जारी, काय आहे पर्यायी मार्ग?

ईव्हीएम वाहतूक आणि निवडणूक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी काही रस्ते बंद ठेवण्यात आले असून, प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

mumbai road update सायन कांदिवली मालाडकरांसाठी ट्रॅफिक ॲडव्हायजरी जारी काय आहे पर्यायी मार्ग

मुंबई: आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात आला आहे. 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी अवघी मुंबई सज्ज होत असतानाच, प्रशासकीय पातळीवर युद्धपातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, या लोकशाहीच्या उत्सवासाठी शहराच्या काही प्रमुख भागांत तुमची 'कोंडी' होण्याची शक्यता आहे. तुम्ही आज घराबाहेर पडणार असाल, तर सावधान! कारण सोमवार, 13 जानेवारीपासूनच मुंबईतील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर वाहतुकीचे निर्बंध लागू करण्यात आले असून काही रस्ते थेट सामान्य प्रवाशांसाठी बंद करण्यात आले आहेत.

निवडणुकीच्या काळात ईव्हीएम मशिनची ने-आण आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षित हालचाल ही पोलिसांसमोर मोठी आव्हाने असतात. याच पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक विभागाने सायन, कांदिवली आणि मालाड यांसारख्या वर्दळीच्या परिसरांमध्ये मोठे बदल केले आहेत.

सायन पूर्वेकडील वॉर्ड क्रमांक 172 ते 181 साठी ईव्हीएमची वाहतूक याच मार्गांवरून होणार असल्याने, येथे विशेष कडक शिस्त पाळली जात आहे. आर. एल. केळकर मार्ग आणि स्वामी वल्लभदास रोड यांसारख्या मुख्य रस्त्यांवर मंगळवारपासून 17 जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत सर्वसामान्यांच्या वाहनांना प्रवेश नाकारण्यात आला आहे.

हेही वाचा: BMC Election Time Update: मतदानाला लवकर निघा, वेळ कमी आहे; मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय

सायन परिसरात होणारी ही संभाव्य कोंडी टाळण्यासाठी प्रवाशांना सायन-ट्रॉम्बे रोड किंवा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे यांसारख्या महामार्गांचा वापर करण्याचा पर्याय सुचवला आहे. विशेष म्हणजे, निवडणूक कामात अडथळा निर्माण करणाऱ्या किंवा वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या वाहनचालकांवर 'मोटार वाहन कायद्या'नुसार कठोर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे घाईघाईत शॉर्टकट शोधणे तुम्हाला महाग पडू शकते.

तिकडे पश्चिम उपनगरातही कांदिवली आणि मालाडमधील चित्र वेगळे नाही. वसांजी लालजी रोड आणि बजाज रोड यांसारख्या गजबजलेल्या ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली आहे. मार्वे रोडवरून उत्तरेकडे जाणाऱ्या प्रवाशांना आता बाफिरा जंक्शनवरून वळून नेहरू रोड किंवा एसव्ही रोडचा आधार घ्यावा लागणार आहे. स्टेशन परिसरातील गर्दी लक्षात घेता दळवी रोडचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले असून, पोलिसांच्या या 'मेगा प्लॅनिंग'मुळे प्रवाशांना थोडा मनस्ताप सहन करावा लागू शकतो.

निवडणूक शांततेत पार पडणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच शहराची गती टिकवून ठेवणेही आवश्यक आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी म्हणजेच 15 जानेवारीला होणारी गर्दी आणि त्याआधीचे हे निर्बंध लक्षात घेता, मुंबईकरांनी शक्य असल्यास सार्वजनिक वाहतुकीचा आणि पर्यायी मार्गांचा अवलंब करावा. पोलिसांच्या या आव्हानाला प्रतिसाद देऊन आपला प्रवास सुखकर करणे आता सर्वस्वी नागरिकांच्या हातात आहे.

हेही वाचा: Jilha Parishad Election 2026 : 'शौचालय' नसेल तर उमेदवारी रद्द! सर्वोच्च न्यायालयाचा 15 फेब्रुवारीचा अल्टिमेटम


सम्बन्धित सामग्री