मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या सत्तेची चावी कोणाकडे जाणार, याचा फैसला उद्या, 15 जानेवारी रोजी होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गाजत असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्या सकाळी साडे सात वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होईल. मंगळवारी सायंकाळी साडे पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आता राजकीय पक्षांनी छुप्या प्रचारावर भर दिला असून, मुंबईतील गल्लोगल्लीत ‘गुफ्तगू’ प्रचाराला वेग आला आहे. मुंबईतील सर्व 227 वॉर्डांमध्ये सध्या शांतता असली तरी राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे.
खाकीचा ‘अभूतपूर्व’ बंदोबस्त: मुंबई बनली छावणी
निवडणूक प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी मुंबई पोलीस यांनी शहरात सुरक्षेचे कडेकोट जाळे विणले आहे. पोलीस आयुक्तांच्या थेट मार्गदर्शनाखाली 10 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 33 पोलीस उपायुक्त आणि 84 सहाय्यक पोलीस आयुक्तांची फौज रस्त्यावर उतरणार आहे. याशिवाय 3000 अधिकारी आणि 25000 हून अधिक कर्मचारी व होमगार्ड्स तैनात करण्यात आले आहेत. विशेषतः संवेदनशील मतदान केंद्रांवर SRPF आणि QRT लक्ष ठेवून असतील, तर BDDS पथके कोणत्याही अनुचित प्रकाराला रोखण्यासाठी सज्ज आहेत.
मतदानाची वेळ आणि विशेष सवलती
उद्या गुरुवारी सकाळी साडे सात ते सायंकाळी साडे पाच या वेळेत मतदारांना आपला हक्क बजावता येईल. मतदानासाठी मुंबईत सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली असली तरी, शेअर बाजाराचे NSE / BSE कामकाज सुरू राहणार आहे. मात्र, कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सवलत मिळावी यासाठी सेटलमेंटसाठी पुढील दिवसाचा कालावधी दिला जाणार आहे. मुंबईकरांनी लोकशाहीच्या या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.
हेही वाचा: Pune Election Road Updates: पुणेकरांनो, उद्या मतदानाला जाताय ना? मग 'हे' रस्ते टाळा, हे आहेत पर्यायी मार्ग
मतदान पद्धतीतील विशेष बदल
यंदाच्या निवडणुकीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मतदानाची पद्धत. मुंबईत ‘एक वॉर्ड, एक उमेदवार’ या पारंपरिक पद्धतीने मतदान होणार आहे. म्हणजेच मुंबईतील मतदारांना आपल्या प्रभागातून फक्त एकाच उमेदवाराला मत द्यायचे आहे. याउलट, राज्यातील इतर 28 शहरांमध्ये ‘बहुसदस्यीय प्रभाग पद्धत’ राबवण्यात येत असून, तिथे एका प्रभागातून तीन ते पाच उमेदवार निवडले जाणार आहेत. मुंबईची ही स्वायत्तता आणि निर्णयक्षमता राजकारणात अत्यंत कळीची ठरणार आहे.
प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहन
मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, मतदानाच्या दिवशी किंवा आज रात्री कोणत्याही प्रकारची संशयास्पद हालचाल किंवा आचारसंहितेचे उल्लंघन आढळल्यास तात्काळ 100 किंवा 112 या क्रमांकावर कळवावे.
“तुमचे एक मत मुंबईचे भविष्य बदलू शकते, त्यामुळे निर्भयपणे बाहेर पडा आणि मतदान करा,” असा संदेश प्रशासनाकडून देण्यात येत आहे.
निकालाची धाकधूक: 16 जानेवारीला फैसला
उद्याच्या मतदानानंतर सर्व उमेदवारांचे भवितव्य EVM मशीनमध्ये बंद होईल. त्यानंतर अवघ्या काही तासांतच, म्हणजे 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 16 जानेवारीच्या सायंकाळ पर्यंत मुंबईचा नवा ‘किंग’ कोण, याचे चित्र स्पष्ट होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे आणि देशाचे लक्ष आता उद्याच्या मतदानाकडे आणि परवाच्या निकालाकडे लागले आहे.
हेही वाचा: BMC Municipal Elections 2026 : मुंबईतील महापालिका प्रभागांमध्ये मुसलमानबहुल! राजकारणावर याचा काय परिणाम?