मुंबई: येत्या 15 जानेवारीला होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी मुंबईची सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरात एकूण एक कोटी तीन लाख 44 हजारांहून अधिक मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मात्र, यंदाच्या निवडणुकीत प्रशासनाने एक असा बदल केला आहे, जो ऐनवेळी तुमच्या उत्साहावर विरजण घालू शकतो. विधानसभा निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता, अनेक मतदार आरामात मतदान केंद्रावर जाण्याची तयारी करत असतील, पण यंदा परिस्थिती वेगळी आहे.
तुम्हाला वाटत असेल की नेहमीप्रमाणे सायंकाळी सहा वाजेपर्यंत वेळ मिळेल, तर तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता. प्रशासनाने मतदानाची वेळ बदलली असून ती नेमकी काय आहे, हे जाणून घेतल्याशिवाय घराबाहेर पडणे धोक्याचे ठरेल. निवडणुकीचा हा 'एक तास' तुमच्या लोकशाहीच्या अधिकारावर मोठी गदा आणू शकतो. नक्की काय आहे हे वेळेचे गणित?
यंदा मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदानाची वेळ सकाळी साडे सात ते सायंकाळी साडे पाच अशी निश्चित करण्यात आली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत ही वेळ सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत होती. म्हणजेच मतदानाचा एकूण कालावधी एक तासाने कमी करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे दुपारनंतर मतदान केंद्रांवर तुफान गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदारांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता सकाळीच घराबाहेर पडणे हिताचे ठरेल.
हेही वाचा: BMC Election Cash Seized: नालासोपाऱ्यात मतदानापूर्वीच 'लक्ष्मी दर्शन'? पेल्हार पोलिसांनी मध्यरात्री जप्त केली रोकड, काय आणि कसं घडलं?
'पिंक' आणि 'सखी' मतदान केंद्रांचे खास आकर्षण
महिला मतदारांच्या स्वागतासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. प्रत्येक प्रभागात किमान एक 'गुलाबी/सखी' मतदान केंद्र उभारले जाणार आहे. या केंद्रांचे संपूर्ण व्यवस्थापन अगदी सुरक्षेपासून ते प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेपर्यंत, केवळ महिला अधिकारी आणि कर्मचारी सांभाळणार आहेत. गुलाबी रंगाच्या सजावटीसह ही केंद्रं मतदारांसाठी 'आदर्श मतदान केंद्र' म्हणून ओळखली जातील.
दुबार मतदारांना रोखण्यासाठी 'डिजिटल' चक्रव्यूह
मुंबईत सुमारे एक लाख 68 हजार दुबार मतदार असल्याची माहिती समोर आली आहे. यावर लगाम लावण्यासाठी आयुक्त भूषण गगराणी यांनी विशेष योजना आखली आहे. ज्या मतदारांचे नाव दोन ठिकाणी आहे, त्यांना दोन ओळखीचे पुरावे सादर करावे लागतील आणि एकाच ठिकाणी मतदान केल्याचे हमीपत्र द्यावे लागेल. फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
नियोजनाचा वेग : घरोघरी माहिती चिठ्ठी
मतदानाची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी 12 जानेवारीपर्यंत मुंबईतील 60 लाख घरांमध्ये 'मतदार माहिती चिठ्ठी' पोहोचवण्यात आली आहे. उर्वरित मतदारांपर्यंत पोहोचण्याचे काम वेगाने सुरू आहे. या चिठ्ठीवर मतदारांचा भाग क्रमांक, खोली क्रमांक आणि मतदान केंद्राचा पत्ता स्पष्टपणे नमूद केला आहे.
हेही वाचा: Mumbai-Ahmedabad Bullet Train: 7 बोगद्यांचे जाळे अन् 18 महिन्यांचा संघर्ष...राज्यातील 'या' शहरातून जाणार बुलेट ट्रेनचा मार्ग