Friday, February 13, 2026 12:43:48 AM

BMC Election 2026: मतदारांनो व्होटर आयडीचं टेन्शन विसरा; 'या' एका सरकारी पुराव्यावरही नोंदवता येईल मत, वाचा सविस्तर

तुमच्याकडे खालीलपैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र असल्यास तुम्ही मतदान केंद्रावर आपली ओळख पटवू शकता.

bmc election 2026 मतदारांनो व्होटर आयडीचं टेन्शन विसरा या एका सरकारी पुराव्यावरही नोंदवता येईल मत वाचा सविस्तर

मुंबई: लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजेच महापालिका निवडणूक आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. 15 जानेवारी रोजी सकाळी साडे सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार असून, सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत मुंबईकरांना आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत 'व्होटर आयडी' (मतदार ओळखपत्र) नसेल तर मतदान करता येणार नाही, हा गैरसमज दूर करत महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मतदारांना मोठा दिलासा दिला आहे.

ओळखपत्र नाही? काळजी नको!

अनेकदा मतदार यादीत नाव असूनही केवळ हातात मतदार ओळखपत्र नसल्यामुळे नागरिक केंद्रावर जाण्याचे टाळतात. मात्र, गगराणी यांनी स्पष्ट केले आहे की, जर तुमच्याकडे निवडणूक आयोगाचे अधिकृत ओळखपत्र नसेल, तरीही तुम्ही राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेले अन्य 12 प्रकारचे पुरावे दाखवून आपले अमूल्य मत नोंदवू शकता. "मतदान हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे आणि केवळ कागदपत्राअभावी कोणीही या प्रक्रियेपासून वंचित राहू नये," असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

हेही वाचा: Election Commission: रस्त्यावरचा प्रचार संपला, घरोघरी प्रचार सुरुच; आयोगाच्या निर्णयाने सगळेच चकित

तुमच्याकडे यापैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र असल्यास तुम्ही मतदान केंद्रावर आपली ओळख पटवू शकता. यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट (भारतीय पारपत्र), वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), केंद्र/राज्य/स्थानिक संस्थेतील सरकारी कर्मचाऱ्यांचे फोटो असलेले ओळखपत्र, बँक किंवा पोस्ट ऑफिसचे फोटो असलेले पासबुक, मनरेगा जॉब कार्ड, कामगार मंत्रालयाने जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, पेन्शनविषयक फोटो असलेली कागदपत्रे, खासदार किंवा आमदारांना दिलेली अधिकृत ओळखपत्रे, स्वातंत्र्यसैनिकांचे ओळखपत्र तसेच सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला दिव्यांगत्वाचा दाखला यांचा समावेश आहे.

मुंबईकरांच्या हाती सत्तेची चावी

मुंबई महापालिकेच्या या रणधुमाळीत प्रत्येक मत महत्त्वाचे ठरणार आहे. प्रशासनाने मतदानासाठी जय्यत तयारी केली असून, केंद्रांवर आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 15 जानेवारीला होणाऱ्या या मतदानासाठी प्रशासनाने 'जास्तीत जास्त मतदान' करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कामाच्या व्यापामुळे किंवा ओळखपत्राच्या तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांनी घरात न बसता बाहेर पडावे, यासाठी हा विशेष पुढाकार घेण्यात आला आहे.

लोकशाहीचा कणा: तुमची उपस्थिती

"मतदान ही केवळ जबाबदारी नसून ते आपल्या शहराच्या भविष्यासाठी केलेले गुंतवणूक आहे," अशा शब्दांत प्रशासनाने नागरिकांना प्रोत्साहित केले आहे. तुम्ही जर नोंदणीकृत मतदार असाल आणि तुमचे नाव मतदार यादीत असेल, तर वरीलपैकी कोणताही एक पुरावा घेऊन आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर नक्की जा. लक्षात ठेवा, 15 जानेवारी ही तारीख मुंबईच्या आणि राज्याच्या प्रगतीची दिशा ठरवणारी ठरणार आहे.

हेही वाचा: Devendra Fadnavis Interview: " राज ठाकरे माझे आजही मित्र पण उद्धव ठाकरे ..." मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली कबुली


सम्बन्धित सामग्री