मुंबई: येत्या काळात मुंबईच्या राजकारणात सत्तेचा 'हाय व्होल्टेज' ड्रामा पाहायला मिळणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने विजयाचा गुलाल उधळून सत्तेचा गड मिळवला असला, तरी पालिकेचा गाडा सांभाळताना त्यांना पावलोपावली संघर्षाचा सामना करावा लागणार आहे. सत्तेच्या पटलावर भाजप-शिंदे गटाचा महापौर महापालिकेच्या मुख्यालयात विराजमान होणार असला, तरी मुंबईच्या 'प्रशासकीय सूत्रे' मात्र अजूनही उद्धव ठाकरे यांच्याच हाती राहण्याची चिन्हे गडद झाली आहेत.
बहुमतात महायुती, पण ठाकरेंचा 'वचक' कायम
महायुतीने निवडणुकीत विजयाचा झेंडा फडकवत बहुमताचा आकडा पार केला आहे. मात्र, प्रभागनिहाय समीकरणे बदलली आहेत. मुंबईत एकूण 18 प्रभाग समित्या आहेत. यापैकी आठ प्रभाग समित्यांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नगरसेवकांचे स्पष्ट वर्चस्व निर्माण झाले आहे. त्यामुळे मुंबईचा अर्धा भाग आजही तांत्रिकदृष्ट्या 'मातोश्री'च्या प्रभावाखाली राहणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. प्रभाग समित्यांकडे स्थानिक रस्ते, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि आरोग्याशी संबंधित महत्त्वाचे अधिकार असतात, ज्यामुळे स्थानिक पातळीवरील कामांची दोरी ठाकरे गटाच्या हाती असेल.
हेही वाचा: NCP Politics : दिल्लीला जाणं रद्द करून पवारांची पुण्याकडे धाव! राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी रस्सीखेच; अजितदादांनंतर कोणाकडे धुरा?
'प्रभाग समिती' ठरणार सत्तेचे मुख्य केंद्र
मुंबईतील आठ समित्यांवर ठाकरेंचे वर्चस्व, आठ जागा असणाऱ्या एमआयएमकडे एक समिती, तर एका प्रभागात संख्याबळ समसमान असल्याने तिथे 'चिठ्ठी'द्वारे अध्यक्ष निवडला जाईल. अशा परिस्थितीत, विकासकामांच्या फाईल्स मंजूर करताना महापौर आणि प्रभाग समिती अध्यक्ष यांच्यात जुंपण्याची दाट शक्यता आहे. स्थानिक पातळीवरील प्रत्येक कामासाठी महायुतीला ठाकरे गटाशी 'तडजोड' किंवा 'राजकीय समझोता' करावा लागू शकतो. ही परिस्थिती म्हणजे "राजा बसला गादीवर, पण चाव्या मात्र वजीराकडे" अशीच काहीशी झाली आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात संघर्षाची ठिणगी
विशेषतः मुंबई शहर आणि महत्त्वाच्या उपनगरांमध्ये ठाकरे गटाचे नगरसेवक मोठ्या संख्येने निवडून आल्याने, तिथे महायुतीला काम करणे जिकिरीचे ठरेल. प्रभाग समितीचे अध्यक्ष प्रभागातील कामांना प्राधान्य देताना सत्ताधारी महायुतीच्या योजनांना खीळ घालू शकतात. यामुळे आगामी काळात महापौरांच्या मोठ्या घोषणा आणि प्रत्यक्षात प्रभाग समित्यांची अंमलबजावणी यामध्ये मोठा राजकीय पेच पाहायला मिळू शकतो.
ठाकरेंची 'सायलेंट' खेळी आणि आगामी पेच
पालिकेची मुख्य सत्ता हातातून गेली असली, तरी अर्ध्या मुंबईवर स्वतःचा वचक टिकवून ठेवण्यात उद्धव ठाकरे यशस्वी होताना दिसत आहेत. प्रभाग समित्यांच्या माध्यमातून प्रशासकीय कामात अडथळे येण्याची शक्यता असल्याने, महायुतीला सत्तेचा कारभार करताना नाकीनऊ येऊ शकतात. आता हा संघर्ष विकासाच्या आड येणार की राजकीय सोयीसाठी दोन्ही गट एकत्र येऊन काम करणार, याकडे संपूर्ण मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
मुंबई महापालिकेच्या या नव्या रचनेमुळे आगामी पाच वर्षे 'तडजोडीचे राजकारण' आणि 'संघर्षाचा प्रवास' हेच मुंबईचे राजकीय वास्तव असणार आहे.
हेही वाचा: Dhurandhar 2 Teaser Release: 'धुरंधर 2' चा अंगावर शहारे आणणारा टीझर रिलीज; रणवीर सिंगचा भयंकर अवतार अन् 'तो' संवाद ठरतोय चर्चेचा विषय