मुंबई: मुंबईतील पायाभूत सुविधा, सुरू असलेल्या मोठ्या विकास प्रकल्पांवरून होणारी टीका, कोस्टल रोडवरील वाद, तसेच राज्यातील बदलते राजकीय समीकरण यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी महाराष्ट्र न्यूज सोबतच्या खास मुलाखतीत स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली. विकासकामांवरून होणाऱ्या टीकेला उत्तर देतानाच त्यांनी मुंबईच्या भविष्यातील विकासाचा रोडमॅप आणि राजकीय विषयांवरही आपले मत मोकळेपणाने मांडले.
मुंबईत सध्या सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणावरील खोदकामावरून होत असलेल्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. “मुंबईत जर 90 टक्के भाग खोदलेला दिसत असेल, तर त्याकडे विकास सुरू आहे, या दृष्टीने पाहायला हवे,” असे फडणवीस म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, मुंबईतील एक - एक प्रकल्प आम्ही टप्प्याटप्प्याने पूर्ण करत आहोत. जुन्या सरकारने अनेक कामे अर्धवट ठेवली होती. त्यामुळे ती कामे पूर्ण करताना आम्हाला अडचणींचा सामना करावा लागला, तरीही आम्ही सर्व प्रकल्प पूर्ण करून क्लोज करत चाललो आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा: Devendra Fadnavis : 'कितीही टिंगल-टवाळी केली....टोमणे मारले, तरी लोकं कामं लक्षात ठेवतात'; देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना सणसणीत उत्तर
मुंबईतील पायाभूत सुविधांबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, दिल्ली शहरानंतर देशातील सर्वात मोठे पायाभूत नेटवर्क मुंबईत उभे राहत आहे. 2019 पर्यंत मुंबईमध्ये साडेतीनशे ते चारशे किलोमीटरचे नेटवर्क पूर्ण होईल, जे देशातील सर्वात मोठे आणि अतिशय कमी कालावधीत पूर्ण झालेले नेटवर्क असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोस्टल रोड प्रकल्पावर सुरू असलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, “शेजारचा मुलगा आपल्या मांडीवर बसवला म्हणजे तो आपला मुलगा होत नाही.” कोस्टल रोड प्रकल्पात ठाकरे यांचे कोणतेही योगदान नाही. लपून-छपून उद्घाटन करण्यात आले, अशी टीकाही त्यांनी केली.
देशाच्या आर्थिक स्थितीबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, देशाच्या एकूण जीडीपीपैकी सुमारे 65 टक्के वाटा हा शहरांवर अवलंबून आहे. त्यामुळे 2014 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शहरांच्या विकासावर विशेष भर देण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलीकडे देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना, “अजित पवारांचा संयम सुटला आहे,” असे वक्तव्य फडणवीसांनी केले होते. याबाबत स्पष्टीकरण देताना फडणवीस म्हणाले, “मी दुखावलेलो नाही. राजकारणात अशा गोष्टी होत असतात. थोडेसे दुःख झाले, पण इतके नाही की दुखावल्यासारखे वाटावे.”
मुंबईच्या भविष्यातील विकासाबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठा दावा करत सांगितले की, येत्या दहा वर्षांत मुंबई झोपडमुक्त होईल. राजकीय संबंधांबाबत स्पष्ट भूमिका मांडताना ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी आमच्यासाठी दरवाजे बंद केले आहेत. मात्र त्यांनी ते दरवाजे उघडावेत, अशी माझी अपेक्षा नाही. ते कदाचित माझे मित्र नसतील, पण शत्रूही नाहीत.
हेही वाचा: ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत अजित पवारांवर संकट, राजकीय सल्लागाराच्या कार्यालयावर गुन्हे शाखेची कारवाई, अजित पवार म्हणाले, 'पक्ष त्यांच्या पाठीशी...'
राज ठाकरे यांच्याशी असलेल्या मैत्रीबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, निवडणुकीच्या काळात आम्ही एकमेकांवर टीका केली असली, तरी त्याचा आमच्या मैत्रीवर फारसा परिणाम होईल, असे वाटत नाही. मात्र, उद्धव ठाकरे यांनी टीका करताना माझ्या आई-वडिलांवर भाष्य केले, याचे दुःख झाल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. “ते तसे बोलायला नको होते,” असेही त्यांनी नमूद केले.
भावनिक शब्दांत आपली भूमिका मांडताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “आज माझे वडील स्वर्गातून मला पाहत असतील, तर कदाचित त्यांना आनंद होत असेल की मी हिंदुत्वाचा मार्ग सोडलेला नाही. पण आज जर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वर्गातून पाहत असतील, तर उद्धव ठाकरे हे रशीद मामूसोबत बसलेले पाहून त्यांना आनंद होत नसणार,” असे विधान त्यांनी या खास मुलाखतीत केले.
हेही वाचा: Tejaswini Pandit: 'कुणालाही सरसकट मत देऊ नका!’ तेजस्विनी पंडितची इंस्टग्राम पोस्ट चर्चेत, मतदारांना थेट इशारा