BMC Budget 2026: मुंबई महानगरपालिकेत प्रदीर्घ काळानंतर 'प्रशासक राज' संपले असून, महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांच्या नेतृत्वाखालील नवीन सभागृहाचा पहिला अर्थसंकल्प उद्या (बुधवारी) सादर होणार आहे. महायुती सरकारने निवडणुकीत मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर, आता महापालिकेच्या अर्थसंकल्पातून मुंबईकरांच्या पदरात काय पडणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
असे असेल अर्थसंकल्पाचे वेळापत्रक:
उद्या दिवसभर पालिकेत अर्थसंकल्पीय घडामोडींचा वेग वाढणार आहे:
सकाळी 11:00 वाजता: अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे हे शिक्षण समितीचा अर्थसंकल्प अध्यक्षा राजश्री शिरवाडकर यांना सादर करतील.
दुपारी 02:00 वाजता: पालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी हे मुख्य वार्षिक अर्थसंकल्प स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्याकडे सोपवतील.
दुपारी 03:30 वाजता: आयुक्तांची पत्रकार परिषद होऊन अर्थसंकल्पातील मुख्य तरतुदींची माहिती दिली जाईल.
दुपारी 04:00 वाजता: विशेष सभा होऊन 10 नामनिर्देशित सदस्यांची निवड आणि विविध समित्यांच्या पुनर्गठनाचे कामकाज होईल.
यंदाच्या बजेटमध्ये काय खास असू शकते?
गेल्या वर्षी 74,000 कोटींचा असलेला अर्थसंकल्प यंदा 80,000 कोटींच्या पार जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे गेल्या 9 वर्षांत पालिकेच्या तिजोरीचा आकार तब्बल 50,000 कोटींनी विस्तारला आहे.
निधीचा ओघ कोणत्या विभागांकडे वळणार?
यंदाच्या अर्थसंकल्पात खालील महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी मोठी तरतूद अपेक्षित आहे:
पायाभूत सुविधा: वर्सोवा-दहिसर कोस्टल रोड आणि गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (GMLR).
आरोग्य आणि शिक्षण: पालिकेची प्रमुख रुग्णालये आणि प्राथमिक शिक्षणाच्या बळकटीकरणासाठी भरीव निधी.
पर्यावरण: उद्याने, प्राणिसंग्रहालयांचा विकास आणि घनकचरा व्यवस्थापन.
कोळीवाडा विकास: मुंबईच्या मूळ रहिवाशांच्या वस्तूंसाठी (कोळीवाड्यांसाठी) विशेष योजना.
परिवहन: तोट्यात असलेल्या 'बेस्ट'ला आर्थिक मदतीचे विशेष पॅकेज मिळण्याची दाट शक्यता.
हेही वाचा - Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी खुशखबर! खात्यात 'या' महिन्याचे पैसे जमा झाले का? लगेचच चेक करा
करांचा बोजा वाढणार का?
बजेटमधील तूट भरून काढण्यासाठी नवीन सत्ताधारी 'कचरा कर' सारख्या नव्या उपाययोजना किंवा किरकोळ करवाढ करण्याची शक्यता आहे. पालिकेच्या तिजोरीला लागलेली गळती रोखणे आणि उत्पन्नाचे नवे स्रोत शोधणे, हे आयुक्त आणि नवीन सत्ताधाऱ्यांसमोर मोठे आव्हान असणार आहे.