मुंबई: मुंबईची ओळख म्हणजे कधीही न थांबणारा वेग आणि धावपळ. पण आता याच वेगाला संगीताची अनोखी लय लाभणार आहे. मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि मनोरंजक करण्यासाठी मुंबई महानगरपालिका ने सागरी किनारा मार्गावर देशातील पहिल्या 'म्यूझिकल रोड'चा प्रयोग यशस्वी केला आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या आगळ्यावेगळ्या 'मेलडी रोड' प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. अभियांत्रिकीचा चमत्कार आणि कलेचा सुवर्णमध्य साधणारा हा प्रकल्प आता मुंबईच्या आकर्षणात भर घालणार आहे.
काय आहे ही 'संगीतमय' संकल्पना?
हा प्रकल्प मुंबई महापालिकेने अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्ण केला आहे. कोस्टल रोडच्या नरिमन पॉईंटकडून वरळीच्या दिशेने जाणाऱ्या उत्तर वाहिनीवर (Northbound) बोगद्यातून बाहेर पडताच 500 मीटर लांबीचे विशेष 'रंबल पट्टे' लावण्यात आले आहेत. जेव्हा एखादे वाहन 70 ते 80 किमी प्रति तास या ठराविक वेगाने या पट्ट्यांवरून जाते, तेव्हा चाकांच्या घर्षणामुळे स्लमडॉग मिलेनियर या ऑस्करविजेत्या चित्रपटातील 'जय हो' हे गाणं ऐकू येणार आहे.
हेही वाचा: Ajit Pawar Plane Crash: 'रोहित पवारांप्रमाणेच आम्हालाही यात मोठा कट वाटतोय...'; पिंकी माळीच्या वडिलांच्या दाव्याने खळबळ
प्रवासातील सुरक्षितता आणि मनोरंजन
एकाच वेळी केवळ मनोरंजनासाठीच नाही, तर वाहतुकीची शिस्त आणि वेग मर्यादेचे पालन व्हावे, हा देखील यामागचा मुख्य उद्देश आहे. गाण्याचा पूर्ण आनंद घेण्यासाठी वाहनचालकांना आपला वेग मर्यादित ठेवावा लागेल. या 'म्यूझिकल रोड'ची माहिती देण्यासाठी पालिकेने 500 मीटर, 100 मीटर आणि 60 मीटर अंतरावर आगाऊ सूचना फलक लावले आहेत. यामुळे चालकांना मार्ग सुरू होण्यापूर्वीच मानसिक तयारी करता येईल. मुंबईच्या सागरी वाऱ्यासोबत आता हे संगीत प्रवाशांना एक वेगळाच रोमांचक अनुभव देणार आहे.
कोस्टल रोड: मुंबईच्या वेगवान प्रगतीचे प्रतीक
10.8 किमी लांबीचा हा सागरी किनारा मार्ग वरळी आणि मरीन ड्राईव्ह यांमधील अंतर लक्षणीयरीत्या कमी करण्यासाठी ओळखला जातो. 10 पदरी असलेल्या या महामार्गामुळे प्रवासाच्या वेळेत मोठी बचत झाली आहे. हा प्रकल्प ऑगस्ट 2025 मध्ये पूर्णपणे वापरात आला आहे. आता 'मेलडी रोड'च्या समावेशामुळे हा केवळ एक रस्ता न राहता मुंबईच्या पर्यटनाचा आणि आधुनिकतेचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.
मुंबईकरांसाठी हा प्रवास आता केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे नसेल, तर तो संगीत आणि गाण्याच्या तालावर चालणारा एक आनंददायी अनुभव असेल.
हेही वाचा: Subedaar Teaser: 'सुबेदार' चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज; पाहा वयाच्या 69 व्या वर्षी अनिल कपूर यांचा दमदार अॅक्शन अवतार