Sunday, February 15, 2026 06:54:48 AM

Mumbai-Pune Expressway: एक ठिणगीही ठरू शकली असती घातक! मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर बोगद्याजवळ गॅस टँकरचा भीषण अपघात

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर पलटी झाल्याने प्रोपिलीन गॅसची गळती सुरू झाली.

mumbai-pune expressway एक ठिणगीही ठरू शकली असती घातक मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर बोगद्याजवळ गॅस टँकरचा भीषण अपघात

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सोमवारी संध्याकाळी मोठी दुर्घटना घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. आडोशी बोगद्याजवळ एका गॅस टँकरचा अपघात झाला असून टँकर पलटी झाल्यानंतर त्यामधून गॅस गळती सुरू झाल्याचं निदर्शनास आलं. या घटनेनंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव एक्स्प्रेस वेवरील वाहतूक तातडीने थांबवण्यात आली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर उताराच्या ठिकाणी भरधाव वेगात जाणारा टँकर अचानक चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेला आणि थेट बोगद्याजवळ पलटी झाला. सुरुवातीला केवळ वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र दिसत होतं. मात्र काही वेळातच टँकरमधून वायू बाहेर पडत असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर परिस्थिती अधिक गंभीर बनली.

या टँकरमध्ये प्रोपिलीन गॅस असल्याची माहिती समोर आली आहे. हा गॅस अत्यंत ज्वलनशील असल्यामुळे कोणतीही ठिणगी किंवा निष्काळजीपणा मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकतो. ही बाब लक्षात येताच वाहतूक पोलिस, महामार्ग पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संभाव्य धोका टाळण्यासाठी मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली.

अपघातस्थळापासून काही अंतरावरच वाहनं रोखण्यात आल्याने एक्स्प्रेस वेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अनेक प्रवासी तासन्‌तास अडकून पडले होते. काही वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर केला, तर अनेकांना महामार्गावरच थांबावं लागलं. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, गॅस तज्ज्ञ आणि क्रेनच्या मदतीने टँकर बाजूला करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं.

सर्व खबरदारी घेत गॅस गळतीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. परिसरात कुठलाही आगीचा धोका निर्माण होऊ नये म्हणून सुरक्षा यंत्रणा सतर्क असून संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

या घटनेमुळे पुन्हा एकदा धोकादायक रसायनांची वाहतूक, वेगमर्यादा आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतरच वाहतूक सुरळीत केली जाणार असून, अपघाताच्या कारणांचा सखोल तपास केला जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.


सम्बन्धित सामग्री