Wednesday, February 18, 2026 06:23:06 PM

Mumbai Pune Expressway: विमानाच्या वेगाने मुंबई पुणे गाठता येणार; सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प; नव्या सुपरफास्ट एक्सप्रेसवेला मंजुरी

या नव्या एक्सप्रेसवेची रचना करताना भविष्यातील गरजांचा विचार करण्यात आला आहे. वेगवान वाहनांसाठी स्वतंत्र सुरक्षित लेन, धोकादायक वळणांचा अभाव आणि अत्याधुनिक बोगद्यांचा यात समावेश असेल.

mumbai pune expressway विमानाच्या वेगाने मुंबई पुणे गाठता येणार सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प नव्या सुपरफास्ट एक्सप्रेसवेला मंजुरी

मुंबई: मुंबई आणि पुणे या दोन महानगरांना जोडणारा प्रवास आता खऱ्या अर्थाने कात टाकणार आहे. खंडाळा-लोणावळ्याच्या घाटातील दरडी, पावसाळ्यातील वाहतूक कोंडी आणि तासन्‌तास होणारी अडवणूक यातून प्रवाशांची कायमस्वरूपी सुटका होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-पुणे दरम्यानच्या नव्या ‘सुपरफास्ट एक्सप्रेसवे’ला मंजुरी दिल्याची घोषणा केली आहे. ‘वेळ मौल्यवान आहे’ या उक्तीला सार्थ ठरवणारा हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर दोन्ही शहरांमधील अंतर अवघ्या 90 मिनिटांत कापता येणार असून, महाराष्ट्राच्या दळणवळण क्षेत्रात ही एक मोठी क्रांती मानली जात आहे.

सध्याच्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर प्रवासासाठी साधारणतः अडीच  ते तीन तास लागतात. मात्र, सुट्ट्यांच्या काळात किंवा अपघाताच्या प्रसंगी हा प्रवास पाच तासांपर्यंत लांबतो. या समस्येवर जालीम उपाय म्हणून सरकारने सध्याच्या मार्गाला समांतर असा 130 किलोमीटर लांबीचा नवा अत्याधुनिक मार्ग आखला आहे. सुमारे 15000 कोटी खर्चून उभारला जाणारा हा महामार्ग Jawaharlal Nehru Port Authority (JNPA) जवळील अटल सेतूपासून सुरू होऊन थेट पुण्याजवळील शिवरे जंक्शन पर्यंत धावणार आहे. आधुनिक अभियांत्रिकीचा (Engineering) चमत्कार असलेला हा मार्ग प्रवाशांसाठी ‘सुखद प्रवासाची हमी’ ठरणार आहे.

हेही वाचा: India America Tarrif War: भारतासाठी अमेरिकेतून आली मोठी आनंदाची बातमी; ट्रम्प यांचा टॅरिफ प्लॅन फसला?

या नव्या एक्सप्रेसवेची रचना करताना भविष्यातील गरजांचा विचार करण्यात आला आहे. वेगवान वाहनांसाठी स्वतंत्र सुरक्षित लेन, धोकादायक वळणांचा अभाव आणि अत्याधुनिक बोगद्यांचा यात समावेश असेल. घाटातील कठीण चढ-उतार टाळून तयार करण्यात येणारा हा मार्ग म्हणजे तंत्रज्ञानाचा आणि गतीचा सुवर्णसंगम असेल. या प्रकल्पाचा पहिला टप्पा असलेल्या पगोटे (JNPA) ते पनवेलमधील चौकपर्यंतच्या मार्गाला यापूर्वीच मंजुरी मिळाली असून, आता संपूर्ण प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत.

हा महामार्ग केवळ प्रवाशांसाठीच नाही, तर राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी ‘जीवनवाहिनी’ ठरणार आहे. गडकरी यांच्या नियोजनानुसार, हा मार्ग पूर्ण झाल्यावर पुणे-मुंबई-बेंगळुरू हा मोठा प्रवास अवघ्या साडे पाच तासांत पूर्ण होईल. याचा सर्वाधिक फायदा IT हब, ऑटोमोबाईल इंडस्ट्री आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राला होणार आहे. बंदरांशी जोडलेला हा थेट मार्ग असल्याने निर्यातीला मोठी चालना मिळेल आणि पर्यायाने राज्याच्या औद्योगिक प्रगतीचा वेग कित्येक पटीने वाढणार आहे.

विशेष म्हणजे, 2002 मध्ये देशातील पहिला एक्सप्रेसवे देणारे नितीन गडकरी हेच या नव्या प्रकल्पाचेही शिल्पकार आहेत. ‘बोले तैसा चाले’ या वृत्तीने त्यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली आहे. जुना एक्सप्रेसवे हा महाराष्ट्रासाठी अभिमान होता, तर हा नवा मार्ग राज्याच्या ‘आर्थिक महासत्ते’कडे जाणाऱ्या प्रवासातील एक प्रबळ दुवा ठरेल. हा प्रकल्प केवळ एक रस्ता नसून, तो गती, प्रगती आणि सुरक्षिततेचा एक नवा अध्याय असणार आहे.

हेही वाचा: Gold Rate Today: सोनं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर; तुमच्या शहरातील आजचे ताजे दर जाणून घ्या


सम्बन्धित सामग्री