Thursday, February 12, 2026 07:22:19 PM

Online Shopping Fraud: स्वस्त साडीचा मोह आणि हजारोंचा फटका! इंस्टाग्रामवरील बनावट फॅशन पेजमुळे तरुणीची फसवणूक

इंस्टाग्रामवरील बनावट फॅशन पेजवरून साडी खरेदी करताना मुंबईतील तरुणीची हजारो रुपयांची फसवणूक झाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

online shopping fraud स्वस्त साडीचा मोह आणि हजारोंचा फटका इंस्टाग्रामवरील बनावट फॅशन पेजमुळे तरुणीची फसवणूक

Online Shopping Fraud: ऑनलाइन शॉपिंगमुळे खरेदी अधिक सोपी आणि जलद झाली असली, तरी त्याचबरोबर फसवणुकीचे प्रकारही वाढताना दिसत आहेत. विशेषतः सोशल मीडियावरून होणाऱ्या खरेदीत ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना मुंबईतील एका तरुणीसोबत घडली असून, इंस्टाग्रामवरील बनावट फॅशन पेजमुळे तिला आर्थिक फटका बसला आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा वापर आज अनेक नामांकित ब्रँड्स जाहिराती आणि विक्रीसाठी करतात. याचाच गैरफायदा घेत काही भामटे प्रसिद्ध ब्रँडच्या नावाने बनावट अकाउंट्स तयार करतात आणि ग्राहकांचा विश्वास संपादन करतात. मुंबईतील संबंधित तरुणीनेही इंस्टाग्रामवर ‘झारा फॅशन’ नावाचं एक पेज पाहिलं. आकर्षक व्हिडिओ, सुंदर साड्या आणि स्वस्त दर पाहून तिने त्या पेजवरून साडी खरेदी करण्याचा निर्णय घेतला.

साडीची किंमत तुलनेने कमी सांगण्यात आल्याने तरुणीचा विश्वास बसला. मात्र ऑर्डर कन्फर्म करताना संबंधित पेजकडून वेगवेगळ्या कारणांसाठी अधिक रक्कम भरण्याची मागणी करण्यात आली. सुरुवातीला ऑर्डर आणि ट्रॅकिंगसाठी वेगवेगळ्या रकमा पाठवण्यास सांगण्यात आले. ही रक्कम नंतर परत मिळेल, असे सांगून तरुणीला आश्वस्त करण्यात आले.

पैसे पाठवल्यानंतरही साडी मिळाली नाही. उलट, संबंधित पेजकडून पुन्हा फोन करून “रक्कम खात्यात जमा झाली नाही” असे सांगण्यात आले. विश्वास बसावा म्हणून बनावट व्हिडिओ आणि स्क्रीनशॉटही पाठवण्यात आले. यानंतर रिफंड प्रक्रियेसाठी आणखी पैसे पाठवण्याची मागणी करण्यात आली. मात्र यावेळी तरुणीला संशय आला आणि तिने पैसे देण्यास नकार दिला.

नकार देताच त्या बनावट पेजकडून तरुणीचा नंबर ब्लॉक करण्यात आला. त्यानंतर तिला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. एकूण सुमारे सहा हजार रुपयांचा आर्थिक तोटा झाल्याचे समोर आले आहे. घडलेला प्रकार लक्षात येताच तरुणीने जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात या फसवणुकीचा संबंध दुसऱ्या राज्याशी असल्याचे संकेत मिळाले आहेत. सध्या पोलिसांकडून संबंधित सोशल मीडिया अकाउंट आणि व्यवहारांची चौकशी सुरू आहे.

दरम्यान, पोलीस प्रशासनाने नागरिकांना सोशल मीडियावरून खरेदी करताना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. कोणतेही पेज अधिकृत आहे की नाही, त्याची खातरजमा करावी, अनोळखी अकाउंट्सना पैसे पाठवण्यापूर्वी विचार करावा, तसेच संशयास्पद मागण्यांपासून दूर राहावे, असा सल्ला देण्यात आला आहे.


सम्बन्धित सामग्री