तेजस मोहातुरे. प्रतिनिधी. नागपूर: नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. खापरखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या पिपळा डाकबंगला येथील ग्रामपंचायत सदस्य अतुल पाटील (वय: 30 वर्षे) यांचा खून झाला आहे. या घटनेवर स्थानिकांनी संताप व्यक्त करून रस्त्यावर उतरले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
मृत अतुल पाटील यांनी आरोपी हिमांशू याच्याकडून पैसे उधारीवर घेतले होते. या उधारीच्या पैशावरून सोमवारी संध्याकाळी अतुल पाटील आणि आरोपी हिमांशू यांच्यात वाद झाला होता. या वादातूनच अतुल पाटील यांचा खून झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेवर स्थानिकांनी संताप व्यक्त करत रस्त्यावर उतरले. तसेच, नागपूर ते छिंदवाडा या राष्ट्रीय महामार्गावर आणि सावनेरच्या पिपळा डाकबंगला परिसरात स्थानिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. यासह, भाजपचे आमदार आशिष देशमुख यांचे गावकरीही रस्त्यावर उतरले आहेत.
हेही वाचा: 'होय भाजप वॉशिंग मशिन आहे'; भाजप नेते सुनील केदारांचे विरोधकांना प्रत्युत्तर
स्थानिकांनी रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पैशाच्या वादातून हत्या झालेली नसून, यामागे राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तीचा हात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. आरोपी हिमांशू कुंभलकर यामागे राजकीय व्यक्ती असल्याचा आरोप करत प्रकरण तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. तसेच, या प्रकरणात काँग्रेस पक्षाशी संबंधित एका व्यक्तीवरही आरोप केला जात आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास करत आहेत.