Monday, February 09, 2026 02:21:17 PM

Pankaja Munde : 'आई सतत देवाकडे प्रार्थना करत असते...'; हेलिकॉप्टरमधील बिघाडानंतर पंकजा मुंडेंची भावूक प्रतिक्रिया

लातूरच्या प्रचार दौऱ्यासाठी निघण्यापूर्वीच त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले. वेळीच बिघाड लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला.

pankaja munde  आई सतत देवाकडे प्रार्थना करत असते हेलिकॉप्टरमधील बिघाडानंतर पंकजा मुंडेंची भावूक प्रतिक्रिया

Pankaja Munde :  नुकत्याच झालेल्या बारामती विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या प्रवासाबाबत भीतीचे वातावरण असतानाच, भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे एका मोठ्या संकटातून बचावल्या आहेत. लातूरच्या प्रचार दौऱ्यासाठी निघण्यापूर्वीच त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले. वेळीच बिघाड लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला असून, या घटनेनंतर पंकजा मुंडेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

नेमकं काय घडलं?
पंकजा मुंडे आज सकाळी 10:30 वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून लातूरकडे झेप घेणार होत्या. मात्र, उड्डाणापूर्वीच पायलटने हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे स्पष्ट केले. यावर बोलताना पंकजा मुंडें म्हणाल्या, "मला कालच हे हेलिकॉप्टर जुने असल्याचे जाणवले होते. टेक्निकल बाबी मला समजत नाहीत, पण आज उड्डाणापूर्वीच पायलटने अडचण सांगितली आणि दुसरे हेलिकॉप्टर पाठवल्याची माहिती दिली," असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

"आई विचारते, लँडिंग झाली का?"
हेलिकॉप्टर प्रवासातील धोक्यावर बोलताना पंकजा मुंडे काहीशा भावूक झाल्या. त्यांनी सांगितलं, "मी जेव्हा जेव्हा हेलिकॉप्टरने प्रवास करते, तेव्हा माझी आई देव पाण्यात ठेवून बसलेली असते. सतत फोन करून विचारत असते की, विमान लँड झाले का? टेक ऑफ झाले का? बारामतीच्या भीषण अपघातानंतर सर्वांच्याच मनात एक प्रकारचे दडपण आणि भीती आहे."

हेही वाचा - Sunetra Pawar : पुणे आणि बीडच्या पालकत्वाची धुरा आता सुनेत्रा पवारांकडे; अजितदादांचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल

अजितदादांच्या अपघाताची आठवण
अजित पवार यांच्या अपघाती निधनाचा उल्लेख करत पंकजा मुंडे म्हणाल्या, "त्या अपघाताच्या विचारानेच मन हादरून जाते. त्या विमानात असलेल्या लोकांनी शेवटच्या क्षणी किती वेदना आणि भीती अनुभवली असेल, याचा विचार करून आमचे संपूर्ण कुटुंब व्यथित आहे. कार्यकर्तेही मला सतत मेसेज करून विमान किंवा हेलिकॉप्टर न वापरण्याचा सल्ला देत आहेत."

प्रचार सभांवर परिणाम
या तांत्रिक बिघाडामुळे आणि हेलिकॉप्टर बदलण्याच्या प्रक्रियेमुळे पंकजा मुंडे यांच्या आजच्या शेवटच्या दोन नियोजित सभा रद्द होण्याची शक्यता आहे. मात्र, वेळीच सुरक्षेची काळजी घेतल्यामुळे कार्यकर्त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
 


सम्बन्धित सामग्री