Sunday, June 15, 2025 11:59:19 AM

शिरसाटांकडे 67 कोटींची प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी पैसे आले तरी कुठून? संजय राऊतांचा गौप्यस्फोट

संभाजीनगरमधील वेदांत हॉटेलच्या 67 कोटींच्या व्यवहारामुळे शिंदे सरकारमधील मंत्र्याच्या मुलावर गंभीर आरोप झाले असून, राऊतांनी सरकारवर आणि शिरसाटांवर तीव्र टीका केली आहे.

शिरसाटांकडे 67 कोटींची प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी पैसे आले तरी कुठून संजय राऊतांचा गौप्यस्फोट

छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्रातील राजकारणात सध्या मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्याच्या मुलाने तब्बल 67 कोटी रुपयांमध्ये संभाजीनगरमधील प्राईम लोकेशनवरील वेदांत हॉटेलची प्रॉपर्टी विकत घेतली, आणि या व्यवहारामागे मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आता जोर धरू लागला आहे. या संपूर्ण प्रकरणावर उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी थेट शिंदे गटावर आणि शिरसाट पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

राऊत म्हणाले, 'एकनाथ शिंदे यांनी पैसे दिले का? अमित शाह यांनी पैसे दिले? पन्नास पन्नास खोके ज्यांना मिळाले तेच पैसे वापरले का?' असे थेट सवाल उपस्थित करत त्यांनी या व्यवहारातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

हा सर्व व्यवहार मेसर्स सिद्धांत मटेरियल अ‍ॅण्ड सप्लाय या कंपनीमार्फत पार पडला. ही कंपनी मंत्र्याच्या मुलाची असल्याचा आरोप आहे. लिलाव प्रक्रियेचा गैरवापर करून अत्यल्प किंमतीत ही प्रॉपर्टी त्यांच्या नावे करण्यात आली. राऊतांच्या मते, संपूर्ण लिलाव बेकायदेशीर पद्धतीने राबवण्यात आला आणि हॉटेल मिळावे म्हणून शासनाकडून पाठराखण झाली.

हेही वाचा: 'तुम्ही भाजपचे आश्रित आहात'; संजय राऊतांचा राणेंवर आरोप

या प्रकरणात, सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळेच हा व्यवहार पार पडल्याचेही बोलले जात आहे. एवढ्या मोठ्या रकमांचे व्यवहार कोणत्या स्रोतांतून झाले, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. 'हे पैसे दहशत दलालीतून आले का? की सरकारच्या ‘खोके संस्कृती’चा भाग आहेत?' असे परखड प्रश्न राऊतांनी उपस्थित केले आहेत.

दरम्यान, संजय शिरसाट यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, 'हे कौटुंबिक विषय आहेत, आणि अशा विषयांमध्ये राजकीय नेत्यांनी पडू नये. त्यासाठी महिला आयोग आणि महिला आघाडी आहेत.' मात्र, राऊतांनी हा व्यक्तिगत नाही, तर थेट जनतेच्या पैशाचा आणि सरकारी प्रक्रियेच्या गैरवापराचा विषय असल्याचे स्पष्ट केले.

राजकारणात पारदर्शकतेची चर्चा नेहमीच होते, पण या प्रकरणात ती केवळ भाषणापुरती मर्यादित राहिल्याचे दिसते. हे प्रकरण पुढे जाऊन ED किंवा इतर चौकशी यंत्रणांच्या तपासाच्या कक्षेत येईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


सम्बन्धित सामग्री