नागपूर: नागपूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 10 मेपासून नागपूरमधील सर्व पेट्रोल पंपांवर कोणत्याही प्रकारचे डिजिटल पेमेंट स्वीकारले जाणार नाही. विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे हा निर्णय घेतला आहे. डिजिटल पेमेंटच्या व्यवहारामुळे अनेक वेळा बनावट व्यवहार केले जात असून, त्यामुळे पंप चालकांच्या बँक खात्यांतील रक्कम थेट गोठवली जाते. यामुळे आर्थिक नुकसानाचा मोठा त्रास त्यांना सहान करावा लागत आहे.
सध्या देशभरात डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेमुळे बँकिंग व्यवहार, यूपीआय, कार्ड पेमेंट यामार्फत सहजपणे व्यवहार होत असले तरी सायबर गुन्हेगार या सुविधांचा गैरफायदा घेत आहेत. नागपूरातील काही पेट्रोल पंप चालकांच्या खात्यांमध्ये झालेले बनावट व्यवहार, आणि त्यानंतर संबंधित बँकांनी संपूर्ण खाती गोठवणे ही एक गंभीर बाब बनली आहे. विशेष म्हणजे, ही रक्कम गृह मंत्रालयाच्या आदेशाशिवाय परत मिळवता येत नाही, आणि ही प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ व गुंतागुंतीची आहे.
विदर्भ पेट्रोल पंप असोसिएशनचे अध्यक्ष गौरव जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार, त्यांनी अनेक वेळा सायबर क्राइम विभागाकडे तक्रार दिली असूनही त्यांना कोणतेही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव त्यांनी डिजिटल व्यवहार थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा :डोळ्यांवर उन्हाचा घातक परिणाम; संभाजीनगरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढली
हा निर्णय ग्राहकांवर मोठा परिणाम करणारा ठरू शकतो. रोजच्या वापरात पेट्रोल भरण्याचे व्यवहार बऱ्याचदा कार्ड किंवा यूपीआयद्वारे केले जातात. परंतु 10 मेपासून हे व्यवहार रोखीनेच करावे लागतील. त्यामुळे नागरिकांना आता पेट्रोल पंपावर जाताना रोख रक्कम सोबत बाळगावी लागणार आहे.
असोसिएशनने सांगितले आहे की ही तात्पुरती उपाययोजना आहे. जर सरकारने, विशेषतः गृह मंत्रालय व सायबर क्राइम विभागाने लवकरच योग्य तो मार्ग काढला नाही, तर ही बंदी पुढे संपूर्ण महाराष्ट्रभर लागू करण्याचा विचार संघटना करत आहे. ही गोष्ट ‘डिजिटल इंडिया’साठी आग्रही असलेल्या सरकारसाठी एक मोठं आव्हान ठरू शकते.
आता लक्ष सर्वांचे आहे की सरकार या प्रश्नाकडे कसे पाहते व पंप चालकांच्या समस्या सोडवण्यासाठी कोणते उपाययोजना करते. तोवर नागपूरकर नागरिकांनी पेट्रोल पंपांवर रोख व्यवहार करण्याची तयारी ठेवावी, हीच सूचना दिली जात आहे.