Nana Patole Slams BJP: भाजप सरकारच्या धोरणांवर, विशेषतः निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार टीका केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना पटोलेंनी त्यांची तुलना 'नटसम्राट' शी केली आणि 'रोज शब्द फिरवताय, आता नटसम्राटाची भाषा बंद करा आणि शेतकऱ्यांसाठी प्रामाणिक व्हा; असा टोला लगावला.
नाना पटोले म्हणाले की, फडणवीसांच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचे वचन देण्यात आले होते. मात्र, सरकार स्थापनेनंतर हे वचन पाळले गेले नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात पहिल्याच अधिवेशनात सरसकट कर्जमाफी करण्यात आली होती. पण सध्याच्या सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले गेलेले नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत, आणि सरकारकडून केवळ घोषणांचा पाऊस सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा:'ताटातल्या चमच्यांनी ताटातच राहावं' संदीप देशपांडेंचा ठाकरे गटावर घणाघात
निवडणूक आयोगाच्या व्हिडिओ फूटेज प्रकरणावरही नाना पटोलेंनी आक्षेप घेतला. 'हे निवडणूक आयोग बोलत नाही, हे केंद्रातील नरेंद्र मोदींचे सरकार बोलतंय. निवडणूक आयोग फक्त आदेश पाळतंय,' अशी टीका त्यांनी केली. 'रुल 93 केवळ 48 तासांत का बदलला गेला?' असा सवाल करत, निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता न राखल्याचा आरोप केला.
पटोलेंनी केंद्र सरकारवर निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा आरोप करत म्हटलं, 'लोकशाहीवरचा सरकारवर असलेला दबाव संपला आहे. रुल 93 मध्ये बदल करून आणि कोर्टाच्या निकालांच्या विरोधात धोरण आखून केंद्र सरकार जनतेच्या मताचा अपमान करत आहे. यावर निवडणूक आयोगाला जनतेसमोर आणि न्यायालयात उत्तर द्यावं लागेल.'
हेही वाचा:'पुन्हा ठाकरे सरकार येणार'; शिवसेना भवनासमोर फलकबाजी
वकील आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. 'शेलार यांनी केंद्र सरकारने हरियाणा आणि पंजाब हायकोर्टाच्या निकालाविरोधात धोरण का आखले हे स्पष्ट करावं,' असे म्हणत त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
शेवटी, नाना पटोले म्हणाले, 'अनिल अंबानीचं कर्ज माफ करता येतं, मग शेतकऱ्यांचं का नाही? त्यासाठी तिथी पाहायची गरज नाही. त्यामुळे आम्ही अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी करणार आहोत.'
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून केंद्र आणि राज्य सरकारवर हल्लाबोल करत, नाना पटोलेंनी भाजपवर सत्तेचा गैरवापर करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.