Monday, February 09, 2026 01:11:30 PM

Pune Navle Bridge नवले ब्रिजवर 3 दिवस 'नो एंट्री', कारण आणि पर्यायी मार्ग जाणून घ्या

पुण्यातील अपघातप्रवण 19 रस्त्यांच्या यादीत नवले पूल हा सर्वाधिक धोकादायक रस्ता ठरला आहे. यामुळे येथे होणारे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

pune navle bridge नवले ब्रिजवर 3 दिवस नो एंट्री कारण आणि पर्यायी मार्ग जाणून घ्या

पुणे : पुण्यातील नवले ब्रिजवर वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. या पुलावरून जाणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता उपाययोजना करण्यात येत आहे. यासाठी नवले पुलाचा वापर तीन दिवस बंद राहणार आहे. येथील वाहतूक इतर मार्गांकडे वळवण्यात आली आहे. या तीन दिवसांमध्ये नवले पुलावर वेग नियंत्रणासाठी स्पीड कॅमेरे व गॅन्ट्री बसविण्याचे काम करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

या काळात वाहतूक बंद
पुण्यातील अपघातप्रवण 19 रस्त्यांच्या यादीत नवले पूल हा सर्वाधिक धोकादायक रस्ता ठरला आहे. सातत्याने अपघातांच्या घटना घडत असल्याने हा परिसर अपघातप्रवण म्हणजेच ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. अपघातांमुळे वाहनचालकांसह नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत. या कामासाठी 3 ते 5 फेब्रुवारीदरम्यान सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात स्पीड कॅमेरे व गॅन्ट्री बसवले जातील. याचा उपयोग वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांवर नजर ठेवण्यासाठी केला जाईल.

हेही वाचा - Maharashtra Weather Update: कुठे गेली थंडी ? 'या' भागात अवकाळी पावसाचा इशारा; हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

वाहतूक या मार्गांकडे वळवली
पुलावरील काम सुरू असताना  साताराकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात नागरिकांनी कात्रज जुना बोगदा आणि सेवा रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कार्यालयाचे प्रकल्प संचालक यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे वाहतूक पोलिसांनी कात्रज नवीन बोगदा ते नवले ब्रिज दरम्यान 30 किमी प्रतितास वेगमर्यादा लागू केली आहे. याआधी येथे 40 किमी प्रतितास वेगमर्यादा होती. वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्ही, स्पीड गन आणि नव्याने बसविण्यात येणाऱ्या स्पीड कॅमेऱ्यांमार्फत कारवाई केली जाणार आहे.

नवले पुलावर 13 नोव्हेंबर 2025 रोजी भीषण अपघात झाला होता. यात आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर 13 हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते. त्यानंतरही नवले पुलावर अपघातांची मालिका सुरूच होती. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून गॅन्ट्री व स्पीड कॅमेरे बसवण्याचे काम हाती घेतले आहे. या काळात साताराकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे, याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा - Megablock On Mumbai Local : मुंबईकरांनो रेल्वेचं वेळापत्रक बघा; नंतर करा रविवारच्या प्रवासाचं नियोजन


सम्बन्धित सामग्री