नवी मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आले असले तरी जूनमध्ये सुरू होण्याच्या घोषणा प्रत्यक्षात येणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. अदानी उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी याआधी जाहीर केले होते की, हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जून 2025 मध्ये सुरू होईल. मात्र प्रत्यक्षात विमानतळाच्या काही महत्त्वाच्या कामांमध्ये अजूनही प्रगती शिल्लक आहे. परिणामी, विमानतळाच्या उद्घाटनात दीड महिन्याचा विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी, म्हणजेच 15 ऑगस्ट 2025 रोजी, या विमानतळाचे उद्घाटन करण्याची तयारी सुरू आहे. हा कार्यक्रम भव्य स्वरूपात घेण्यात येणार असून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यामध्ये समन्वय साधण्यात येत आहे.
हेही वाचा:सावधान! आशियात कोरोनाची नवी लाट; सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय
विमानतळाच्या दोन धावपट्ट्यांपैकी एक धावपट्टी पूर्णपणे तयार झाली असून त्यावर विमान उड्डाण आणि लँडिंगच्या चाचण्या यशस्वीरित्या पार पडल्या आहेत. त्यामुळे तांत्रिक बाबतीत विमानतळ तयार आहे, असे सांगितले जात आहे. टर्मिनल इमारतीमधील बोर्डिंग पास देणारी यंत्रणा, सुरक्षेची उपकरणं आणि तिकीट तपासणी काऊंटर हेही कार्यान्वित स्थितीत आहेत.
तथापि, टर्मिनल इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराचे बांधकाम अद्याप सुरू असून हे काम पूर्ण होण्यासाठी काही आठवडे लागणार आहेत. याशिवाय, पार्किंग, वाहतूक व्यवस्थापन, वाहतूक सिग्नल, वायफाय नेटवर्क आणि सार्वजनिक सोयी-सुविधांची अंतिम चाचणीही बाकी आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशातील एक प्रमुख प्रकल्प असून तो मुंबई विमानतळावरील वाढत्या ताणाला पर्याय म्हणून विकसित केला जात आहे. या विमानतळाद्वारे दरवर्षी लाखो प्रवाशांची वाहतूक होईल आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक व पर्यटन विकासाला गती मिळेल, असा विश्वास वर्तवण्यात येत आहे.
स्वातंत्र्यदिनी उद्घाटन केल्यास, या ऐतिहासिक दिवशी देशाला नवीन आंतरराष्ट्रीय प्रवेशद्वार मिळेल. परंतु प्रत्यक्षात ते होईल की नाही, यासाठी अजून काही आठवडे प्रतीक्षा करावी लागणार आहे.