नवी मुंबईतील आंतरराष्ट्रिय विमानतळ सध्या खूप चर्चेत आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी 3.30 च्या सुमारास या विमानतळाचे लोकार्पण करतील. या अत्याधुनिक विमानतळ मुंबई, पुणे आणि कोकण परिसरातील व्यापार व पर्यटनाला मोठी चालना देईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मात्र हे विमानतळ सुरू होण्यापूर्वीच याच्या नावाचा वाद रंगला आहे. या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दी बा पाटील यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी आहे. अखेर आज लोकनेते दी. बा.पाटील अंतरराष्ट्रीय विमानतळ अश्या नावाचा नामफकल लावण्यात आला आहे , राज्य सरकारने या नावाला हिरवा कंदील दिला असला तरी केंद्राची परवानगी मिळणं अजून बाकी आहे.
हेही वाचा - Metro 3 Timetable : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार मेट्रो 3 चे उद्घाटन, जाणून घ्या वेळ आणि प्रवासाचा मार्ग
अशातच आता या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. एक्सवर त्यांनी यासंदर्भात एक पोस्ट लिहीली आहे. "नवी मुंबईच्या विमानतळाला स्व.दी बा पाटील साहेबांचे नाव देण्याची स्थानिक भूमिपुत्रांची आग्रही आणि तेवढीच भावनिक मागणी आहे, परंतु दुर्दैवाने या सरकारला अद्यापही स्थानिकांच्या भावना समजलेल्या दिसत नाहीत. आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी तरी आजच्या भाषणात स्थानिक भूमिपुत्रांच्या भावना समजून घेत विमानतळाला स्व.दी बा पाटील साहेबांचे नाव देण्याची अधिकृत घोषणा करावी", अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.