नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीवरून निर्माण झालेले राजकीय वादळ अखेर शांत झाले आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या ‘सस्पेन्स’वर पडदा पडला असून, नवी मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा दिमाखात फडकला आहे. अत्यंत चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ऐनवेळी माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली आहे.
राजकीय डावपेचांच्या या खेळात अखेर भाजपने बाजी मारली असून, महापौरपदासाठी भाजपच्या सुजाता पाटील आणि उपमहापौरपदासाठी दशरथ भगत यांची बिनविरोध निवड झाली आहे. महापालिकेत भाजपकडे 56 तर शिवसेनेकडे 42 नगरसेवकांचे संख्याबळ होते.
संख्याबळ कमी असतानाही शिवसेनेने दोन्ही पदांसाठी अर्ज दाखल करून निवडणुकीत रंगत निर्माण केली होती. यामुळे वनमंत्री आणि भाजप नेते गणेश नाईक यांच्या वर्चस्वाला थेट आव्हान दिले जात असल्याची चर्चा होती, मात्र आज झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने दोन्ही अर्ज मागे घेतल्याने भाजपचा मार्ग मोकळा झाला.
हेही वाचा: Parth Pawar : टेंशन कायम! पार्थ पवार यांना क्लिनचीट नाही; अहवाल सादर करण्यासाठी 7 दिवसांची मुदतवाढ
नवी मुंबई हे गणेश नाईक यांचे अभेद्य बालेकिल्ला मानले जाते आणि या निकालाने त्यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात जोरदार शाब्दिक चकमकी उडाल्या होत्या. "पक्षाने परवानगी दिली तर टांगा पलटी करून घोडे बेपत्ता करेन," या गणेश नाईकांच्या विधानाने राजकारण तापले होते. मात्र, प्रत्यक्ष निकालाच्या वेळी हे राजकीय युद्ध शमल्याचे चित्र दिसले आणि कार्यकर्त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
निवडणूक बिनविरोध झाली असली तरी, पडद्यामागील नाराजीचे सूर मात्र स्पष्ट उमटत आहेत. "आम्ही महापौरपदासाठी अर्ज मागे घेऊन ‘युतीधर्म’ पाळला, परंतु भाजपने उपमहापौरपदही स्वतःकडे ठेवून युतीधर्माचे पालन केले नाही," असा उघड आरोप शिंदे गटाच्या शिवसेनेकडून करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेत जरी कमळ फुलले असले, तरी युतीमधील ही खदखद आगामी काळात नवी वळणे घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तब्बल सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नवी मुंबई महापालिकेला नवीन कारभारी मिळाले आहेत. 'जय महाराष्ट्र न्यूज'च्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडीनंतर भाजप गोटात आनंदाचे वातावरण असून कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आहे. सुजाता पाटील आणि दशरथ भगत यांच्या निवडीमुळे आता नवी मुंबईच्या विकासाला नवी गती मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा: Aadhaar Deactivated: UIDAI चा मोठी कारवाई; देशातील 2.5 कोटी आधार क्रमांक कायमचे हटवले, 'या' एका कारणामुळे घेण्यात आला निर्णय