नवी मुंबई: महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान भाजप नेते व वनमंत्री गणेश नाईक यांना मतदानासाठी चांगलीच धावपळ करावी लागल्याचा प्रकार समोर आला आहे. मतदान केंद्र शोधताना आलेल्या अडचणींमुळे गणेश नाईक यांनी निवडणूक आयोगाच्या नियोजनावर संताप व्यक्त केला आहे.
नवी मुंबईमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेल्या गणेश नाईकांना सुरुवातीला आपले मतदान केंद्र सापडले नाही. खूप धावपळ केल्यानंतर अखेर त्यांना योग्य मतदान केंद्र सापडले आणि त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
हेही वाचा: Nagpur Election : नागपूरमध्ये किती जागांसाठी लढत? मतदारराजाचा कौल कोणाला...जाणून घ्या कोणत्या पक्षांमध्ये चुरशीचा सामना?
या संदर्भात आपला अनुभव सांगताना गणेश नाईक म्हणाले की, “आतापर्यंत आम्ही नेहमी शाळा क्रमांक 94 मध्ये मतदान करत होतो. मात्र यावेळी वेगळीच शाळा देण्यात आली. त्या ठिकाणी गेल्यानंतर केंद्र क्रमांक 9 अस्तित्वातच नव्हता. तसेच केंद्र क्रमांक 9 च्या यादीत आमचे नावही नव्हते,” असे त्यांनी सांगितले.
या गोंधळावर नाराजी व्यक्त करताना गणेश नाईक म्हणाले की, “जर माझ्यासारख्या आमदार, राज्याचा मंत्री असलेल्या व्यक्तीला अशी अवस्था येत असेल, तर सर्वसामान्य मतदारांची काय अवस्था होत असेल, याचा अंदाज तुम्हीच घ्या.” निवडणूक आयोगाने या बाबीकडे अधिक लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
मतदानाच्या दिवशी मतदारांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी नियोजन अधिक प्रभावी असणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. या घटनेमुळे नवी मुंबईतील मतदान व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, सामान्य मतदारांमध्येही संभ्रम निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा: BMC Election 2026: मतदान केंद्रात नक्की चाललंय काय? पत्रकारांना चक्क...; मुंबई महापालिका निवडणुकीत पारदर्शकतेचा बोजवारा?