Monday, June 23, 2025 11:17:08 AM

वर्धापन दिनी सुप्रिया सुळे यांचे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस चर्चेत; कोणावर आहे रोख?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 26व्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही गटांचे वेगळे कार्यक्रम चर्चेत आहेत. सुप्रिया सुळे यांचे भावनिक व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस चर्चेचा विषय ठरले आहे.

वर्धापन दिनी सुप्रिया सुळे यांचे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस चर्चेत कोणावर आहे रोख

Supriya Sule Whatsapp Status: आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. मात्र यावर्षीचा वर्धापन दिन विशेष चर्चेत आहे कारण पक्ष आता दोन गटांत विभागला गेला आहे. एक गट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली तर दुसरा गट ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली. हे दोन्ही गट आज वेगवेगळ्या ठिकाणी मेळावे घेत आहेत. अजित पवार गटाने पुण्यातील बालेवाडीमध्ये भव्य मेळावा भरवला आहे, तर शरद पवार गटाचा मेळावा पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात होत आहे.

दरम्यान, या साऱ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांच्या एका व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवली आहे. 'आपली बाजू कितीही खरी असली तरी अन्याय होत असतो... आपल्या गोष्टी हातात नसतात... तेव्हा घट्ट व्हायचं, सहन करायचं,' असे त्या स्टेटसमध्ये लिहिलं आहे. या स्टेटसचा अर्थ काय? त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे? याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा: Ganja racket exposed: दक्षिण महाराष्ट्रातील गांजाच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; 30 लाखांचा मुद्देमाल जप्त

पक्ष विलीनीकरणाची जोरदार चर्चा सुरू असताना, सुप्रिया सुळे यांचे हे भावनिक आणि प्रतीकात्मक स्टेटस अनेक अर्थांनी घेतले जात आहे. काहींनी यामागे पक्षातील अंतर्गत मतभेद असल्याचे सूचित केले, तर काहींनी हा वैयक्तिक भावनांचा उद्गार असल्याचे म्हटले. विशेष म्हणजे, सोशल मीडियावर या स्टेटसवरून अनेकांना असे वाटले की सुळे यांनी कोणावर तरी अप्रत्यक्ष टीका केली आहे.

या स्टेटसविषयी खुद्द सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी स्पष्ट उत्तर दिले. 'मी त्या स्टेटसमध्ये माझ्या आईचा संदर्भ दिला आहे. माझ्या आईने कायम संयम, सहनशीलता आणि सचोटी यांचा आदर्श घालून दिला. त्याच भावनेतून मी ते शब्द लिहिले. आपल्या देशात लोकशाही आहे, आणि प्रत्येकाला आपली भावना मांडण्याचा हक्क आहे,' असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: भावासाठी ट्विट केलं, पण नंतर डिलीट केलं? निलेश राणे म्हणाले, 'त्याने मला अधिकार...

सुळे यांच्या या स्पष्टीकरणामुळे काही अंशी संभ्रम दूर झाला असला तरीही, त्यांच्या शब्दांत दडलेला हळवा सूर आणि राजकीय घडामोडी पाहता, हा संदेश केवळ वैयक्तिक अनुभवावर आधारित आहे का, की पक्षातील तणावावर एक सूचक टिप्पणी आहे, हे मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये सध्या अस्तित्वासाठीची लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या काळात सुळे यांचे हे वक्तव्य आणि स्टेटस पक्ष कार्यकर्त्यांमध्ये एक भावना निर्माण करत आहे की संघर्ष असो किंवा अन्याय, टिकून राहण्याची ताकद महत्त्वाची आहे.

राजकीय घडामोडींच्या या वळणावर सुप्रिया सुळे यांचे शब्द म्हणजे केवळ  प्रतिक्रिया नसून, पक्षातील अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनातील भावना आणि संभ्रम यांचे प्रतिबिंबही असू शकते.


सम्बन्धित सामग्री