Monday, February 09, 2026 01:39:17 PM

Solapur ZP Election 2026 : सोलापुरात 'नातेगोत्याचं' राजकारण ! कार्यकर्त्यांना डावलून आमदार-खासदारांच्या पत्नी, मुलं आणि भाऊ मैदानात

जिल्हा परिषद आणि 11 पंचायत समित्यांच्या जागांसाठी होणाऱ्या मतदानात जिल्ह्यातील मातब्बर राजकीय घराण्यांनी आपल्याच कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी दिली आहे.

solapur zp election 2026  सोलापुरात नातेगोत्याचं राजकारण  कार्यकर्त्यांना डावलून आमदार-खासदारांच्या पत्नी मुलं आणि भाऊ मैदानात

Solapur ZP Election 2026 : सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुन्हा एकदा घराणेशाहीने पाय घट्ट रोवले आहेत. जिल्हा परिषद आणि 11 पंचायत समित्यांच्या जागांसाठी होणाऱ्या मतदानात जिल्ह्यातील मातब्बर राजकीय घराण्यांनी आपल्याच कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे सामान्य कार्यकर्त्यांमध्ये काहीशी नाराजी असली तरी, सोलापूरच्या मैदानात 'भाऊ, बहीण, मुलगा आणि बायको' असाच सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कुठे कोणाचे वारसदार रिंगणात?

सोलापुरातील बड्या नेत्यांनी आपल्या नातेवाईकांसाठी मोर्चेबांधणी केली आहे. त्याची काही प्रमुख उदाहरणे खालीलप्रमाणे:

1. मोहिते-पाटील आणि सातपुते घराणे (माळशिरस)

अर्जुनसिंह मोहिते पाटील: खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलत बंधू (फोंडशिरस गट).
वैष्णवीदेवी मोहिते पाटील: अर्जुनसिंह यांच्या पत्नी (यशवंतनगर गण).
संस्कृती राम सातपुते: माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी (दहिवडी गट).

2. कल्याणशेट्टी आणि म्हेत्रे संघर्ष (अक्कलकोट)

अक्कलकोटमध्ये आमदार आणि माजी मंत्र्यांच्या घरातच तिकिटांचे वाटप झाले आहे:

शांभवी कल्याणशेट्टी: आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी (चपळगाव गट).
सागर कल्याणशेट्टी व पूजा कल्याणशेट्टी: आमदारांचे बंधू आणि वहिनी देखील मैदानात.
शीतल आणि शिवराज म्हेत्रे: माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची कन्या आणि मुलगा अनुक्रमे तोळनूर आणि सलगर गटातून नशीब आजमावत आहेत.

3. जानकर आणि माने यांचे सुपुत्र (माढा व उत्तर सोलापूर)

जीवन उत्तम जानकर: आमदार उत्तम जानकर यांचे चिरंजीव (दहिवडी गट).
डॉ. पृथ्वीराज दिलीप माने: माजी आमदार दिलीप माने यांचे सुपुत्र (कोंडी गट).
पृथ्वीराज शिवाजीराव सावंत: माढ्यातील नेते शिवाजीराव सावंत यांचे पुत्र (मानेगाव गट).

4. इतर महत्त्वाचे नातेवाईक

लक्ष्मी रतिकांत पाटील: माजी आमदार रतिकांत पाटील यांच्या पत्नी (हत्तूर गट - दक्षिण सोलापूर).
उमेश आणि संतोष पाटील: मोहोळमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील स्वतः आणि त्यांचे भाऊ संतोष पाटील (शिवसेना) समोरासमोर नसले तरी वेगवेगळ्या गटातून नशीब आजमावत आहेत.

हेही वाचा - Akola Mayor Election Twist : अकोल्यात भाजपला रोखण्यासाठी 'महाखिचडी' पॅटर्न? प्रकाश आंबेडकर किंगमेकरच्या भूमिकेत; बंद दाराआड खलबतं

कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता?

दरम्यान, जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून केवळ नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाच संधी मिळाल्याने 'घराणेशाही'ची चर्चा जोर धरत आहे. विशेषतः माळशिरस आणि अक्कलकोटमध्ये घरातीलच अनेक सदस्यांना उमेदवारी दिल्याने सामान्य कार्यकर्त्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


सम्बन्धित सामग्री