Wednesday, July 09, 2025 10:12:26 PM

छगन भुजबळ यांचे हृदयविकाराने निधन झाल्याची बातमी खोटी; यूट्यूब चॅनेलवर गुन्हा दाखल

28 जून रोजी एका अज्ञात व्यक्तीने सोशल मीडियावर मंत्री भुजबळ यांचे हृदयविकाराने निधन झाल्याची खोटी बातमी पसरवली. ही खोटी बातमी टीव्ही न्यूज चॅनेल म्हणून सादर करण्यासाठी, चुकीचा लोगो वापरण्यात आला.

छगन भुजबळ यांचे हृदयविकाराने निधन झाल्याची बातमी खोटी यूट्यूब चॅनेलवर गुन्हा दाखल
Chhagan Bhujbal
Edited Image

Chhagan Bhujbal Death Rumor: महाराष्ट्राचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मृत्यूची खोटी बातमी सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी नाशिक सायबर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या मृत्यूची ही खोटी बातमी एका यूट्यूब चॅनेलने प्रसारित केली होती, ज्यामध्ये एका प्रमुख टीव्ही चॅनेलचा बनावट लोगो देखील वापरण्यात आला होता. या प्रकरणात नाशिक सायबर पोलिसांनी एका अज्ञात संशयितावर गुन्हा दाखल केला आहे.

छगन भुजबळ यांच्या निधनाची खोटी बातमी व्हायरल -  

प्राप्त माहितीनुसार, 28 जून रोजी एका अज्ञात व्यक्तीने सोशल मीडियावर मंत्री भुजबळ यांचे हृदयविकाराने निधन झाल्याची खोटी बातमी पसरवली. ही खोटी बातमी टीव्ही न्यूज चॅनेल म्हणून सादर करण्यासाठी, चुकीचा लोगो वापरण्यात आला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हा व्हिडिओ यूट्यूबवर खूप वेगाने व्हायरल झाला आणि काही वेळातच सुमारे 1.25 लाख लोकांनी तो पाहिला.

यूट्यूब चॅनेलविरुद्ध गुन्हा दाखल

तापासात असे दिसून आले की, एका अज्ञात व्यक्तीने एका टेलिव्हिजन चॅनेलचा लोगोचा वापर करून भुजबळ यांच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवली. ही बातमी सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल झाली. नाशिक पोलिसांनी या प्रकरणात @Nana127tv नावाच्या यूट्यूब चॅनेलविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, ज्याचे डिस्प्ले नाव 'हेल्पलाइन किसान' आहे.

हेही वाचा - आडूळ येथील घरफोडी गुन्ह्यातील आरोपीला 2 लाख 70 हजारांच्या मुद्देमालासह अटक

विशेष शाखेचे अधिकारी सुनील बहरवाल यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली. सोशल मीडियावर त्यांना भुजबळांच्या मृत्यूच्या बातमीचा व्हिडिओ दिसला. ज्यामध्ये 'मंत्री छगन भुजबळ यांचे हृदयविकाराने निधन' असे लिहिले होते. तपासात असे दिसून आले की, रंजीताई बोरस्ते यांच्या निधनानंतर भुजबळांनी यूट्यूबवर त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. मात्र, एका अज्ञात व्यक्तीने भुजबळांच्या मृत्यूची खोटी बातमी बनवून ती व्हायरल केली.

हेही वाचा - लालपरीने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 1 जुलैपासून आगाऊ बुकिंगसाठी MSRTC तिकिटांवर मिळणार 15 टक्के सूट

छगन भुजबळांच्या मृत्यूची बातमी पूर्णपणे खोटी - 

दरम्यान, भुजबळांच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवणाऱ्या @Nana127tv यूट्यूब चॅनलविरुद्ध शहर सायबर पोलिसात भारतीय दंड संहिता (BNS) च्या कलम 353(1), 345(3), 66 (a) आणि आयटी कायद्याच्या कलम 103 आणि भारतीय ट्रेडमार्क कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तथापी, छगन भुजबळ पूर्णपणे निरोगी असून सोशल मीडियावर पसरवण्यात आलेली त्यांच्या मृत्यूची बातमी पूर्णपणे खोटी आहे. अधिकाऱ्यांनी नागरिकांना सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बातम्यांची सत्यता पडताळल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नका आणि शेअर करू नका असे आवाहन केले आहे. 
 


सम्बन्धित सामग्री