Tweet Controversy: शिवसेना आमदार निलेश राणे यांनी त्यांच्या वादग्रस्त ट्विट आणि भावनिक वक्तव्यांमुळे निर्माण झालेल्या चर्चेला पत्रकार परिषद घेऊन स्पष्टता दिली. ‘नितेश माझा भाऊ आहे, माझा हक्क आहे’ असं ठामपणे सांगत त्यांनी त्यांच्या भावाच्या बाबतीत बोलण्याचा अधिकार असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित केलं.
निलेश राणे म्हणाले, 'मी ट्विट केलं, पण नंतर ते डिलीट केलं. काहीही टोकाचं नव्हतं. सहज बोललो आणि सहज काढलं. यापूर्वीही मी शरद पवार किंवा उबाटा यांच्या बाबतीत असे ट्विट काढले होते. मला महायुतीत सगळं सुरळीत आणि एकसंघ पाहिजे आहे. म्हणून मी बोललो. मला वाटतं होतं की हे मुद्दे सार्वजनिक होण्याऐवजी आपल्यातच मिटावेत.'
भावनिक आणि राजकीय दृष्टीने महत्वाच्या या मुद्यावर बोलताना निलेश राणे म्हणाले, 'नितेश माझा धाकटा भाऊ आहे. तो मला वडिलांसारखा सन्मान देतो. त्यामुळे मला त्याच्यावर बोलण्याचा अधिकार आहे. हा अधिकार त्यानेच मला दिला आहे. मी इथे होतो म्हणून बोललो, पण समोर असतो तरी तेच बोललो असतो.'
ते पुढे म्हणाले की, सध्याची राजकीय परिस्थिती महायुतीसाठी अनुकूल आहे. 'आज राज्यात आपला स्पर्धक नाही. आपण सर्व निवडणुका आरामात जिंकू शकतो, फक्त आपल्या मध्ये एकवाक्यता आणि एकसंघता असली पाहिजे. नितेशचं म्हणणंही वेगळं नाही. काही गोष्टी चुकल्या असतील तर त्या आपण सुधारू शकतो. आपल्याला याचा मार्ग नक्की सापडेल.'
ट्विट प्रकरणावर पडदा टाकताना निलेश राणे यांनी स्पष्ट केलं की, हे संपूर्ण प्रकरण केवळ एका भावाने दुसऱ्या भावाला दिलेल्या सल्ल्यापुरतं मर्यादित होतं. 'यात उगाच उबाठाला किंवा इतर कुणाला फायदा घेण्यासारखं काही नाही. हे एक कुटुंबातील, संघटनांतील संवादाचं उदाहरण आहे. त्यातून काही राजकीय वाद उभे करणं योग्य नाही.'
या पत्रकार परिषदेनंतर निलेश राणेंनी स्पष्टपणे संदेश दिला की, भाजप-शिवसेना युतीमधील एकसंघता आणि संघटनात्मक सुसंवाद कायम ठेवणं हेच आजचं प्रमुख उद्दिष्ट आहे. या संपूर्ण प्रकरणावर पूर्णविराम देण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी ठरणार का, हे पुढील राजकीय घडामोडींवर अवलंबून असेल. मात्र, ‘नितेश माझ्या हक्काचा’ या एका वाक्याने निलेश राणेंनी भावनिक आणि राजकीय दोन्ही पातळ्यांवर आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.