Nitesh Rane's troubles increase: मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणेंच्या अडचणीत लक्षणीय वाढ झाली आहे. खासदार संजय राऊत यांच्याविरोधात 2023 मध्ये केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाईचा फटका बसत आहे. याच प्रकरणात माझगाव न्यायालयाने त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे.
संजय राऊत यांनी 2023 मध्ये नितेश राणे यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या सुनावणीसाठी राणे वारंवार गैरहजर राहिले. त्यांनी दोन जून रोजी सुनावणीसून गैरहजेरीसाठी अर्ज केला होता. मात्र, गुरुवारी झालेल्या सुनावणीत न्यायमुर्ती ए. ए. कुलकर्णी यांनी राणे यांचा अर्ज फेटाळून त्यांच्यावर अजामीनपात्र वॉरंट बजावले. पुढील सुनावणी 18 जुलै रोजी होणार आहे.
हेही वाचा: 'मी कोणत्याही राजकारण्याला ओळखत नाही' आशा भोसले यांचं स्पष्ट विधान
नितेश राणे हे संजय राऊत यांच्यावर जाहीर सभांमधून वारंवार टीका करत आले आहेत. 2023 मध्ये एका भाषणादरम्यान त्यांनी राऊत यांचा 'साप' असा उल्लेख करत म्हटलं होतं की, 'संजय राऊत साप आहे. ते कधीही उद्धव ठाकरेंना सोडून शरद पवारांकडे जातील.'
या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी मानहानीचा खटला दाखल करत न्यायालयात दाद मागितली होती. आता कोर्टाने त्यावर गंभीर दखल घेत वॉरंट बजावल्याने राणेंच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.