चंद्रकांत शिंदे, मुंबई: एक काळ होता जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात मातोश्रीचे एक विशेष स्थान होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना राज्यातील मुख्यमंत्री आणि अन्य नेत्यांसोबतच पंतप्रधानांपासून दिल्लीतील अनेक नेते त्यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर येत असत. या भेटी कधी कौटुंबिक असत तर कधी राजकारणावर चर्चा करण्यासाठी असत. बाळासाहेबांबरोबर मतभेद असलेले अनेक नेतेही मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांना भेटलेले आहेत. बॉलिवूडमधील दिलीप कुमारसह अनेक कलाकार बाळासाहेबांना भेटण्यासाठी मातोश्रीवर जात असत. त्यामुळे मातोश्री हे महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्वाचे स्थान मानले जात होते. निवडणुका आल्या की बाळासाहेबांना भेटण्यासाठी नेत्यांची रिघ लागत असे. बाळासाहेब आपल्या अटी-शर्तीनुसार युती करीत असत. आणि सगळे नेते बाळासाहेबांचे म्हणणे ऐकतही असत.
अगदी 2014 पर्यंत मातोश्रीवर विविध नेत्यांची रीघ लागत असे, परंतु त्यानंतर मातोश्रीवर अन्य पक्षातील नेत्यांची रीघ कमीच झाली. उलट उद्धव ठाकरेंनाच शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओक ते दिल्लीपर्यंत सोनिया, राहुंल गांधींच्या भेटीसाठी जावे लागले. तर दुसरीकडे हातात सत्ता नसतानाही राज ठाकरे यांनी करिश्मा दाखवत शीवतीर्थ सत्ता केंद्र असल्याचे जनतेसमोर अधोरेखित केले. राज्य सरकारमधील अनेक मंत्री विविध गोष्टींवर चर्चा करण्यासाठी शिवतीर्थावर जाऊ लागले.
पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. या भेटीत विविध विषयांवर चर्चा झाली. एवढेच नव्हे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपासून अनेक मंत्र्यांनी विविध वेळी राज ठाकरेंच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुलगा श्रीकांत शिंदेसह राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंतही उपस्थित होते. केवळ राजकीय नेतेच नव्हे तर बॉलिवूडमधील अगदी सलमान खानपासून जावेद अख्तरपर्यंत अनेक कलाकार शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेऊन चर्चा करीत असताना दिसतात.
खरंतर विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे दादरमधून विधानसभेच्या निवडणुकीत उतरले होते. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी अमित ठाकरे यांच्यासमोर सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली होती. एवढेच नव्हे तर कल्याणमध्येही मनसेच्या राजू पाटील यांच्याविरोधातही उमेदवार दिला होता. लोकसभेला राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मदत केली असतानाही एकनाथ शिंदे यांनी विधानसभेला मनसेच्या उमेदवाराविरोधात उमेदवार दिले होते, असे असतानाही राज ठाकरे यांनी मोठ्या मनाने एकनाथ शिंदेंचे शिवतीर्थावर स्वागत केले होते.
हेही वाचा: पदविका अभ्यासक्रमाच्या अर्जासाठी 30 जूनपर्यंत पुन्हा संधी; नवीन वेळापत्रक जाहीर
राज ठाकरे यांनी मराठी माणसासाठी उद्धव ठाकरेंसोबत जाण्याचे संकेत दिले असतानाच राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये राज ठाकरे यांची भेट घेतली आणि राजकीय वर्तुळात नव्या संकेताची पायाभरणी झाली. २००५ मध्ये शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाची स्थापना केली. पहिल्याच विधानसभा आणि मनपा निवडणुकीत त्यांना चांगले यश मिळाले. नाशिक महानगरपालिकेत तर सत्ताही स्थापन केली. मात्र ते यश त्यांना टिकवता आले नाही. स्वतःची राजकीय ओळख निर्माण करण्यासाठी राज ठाकरे यांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या, मात्र तरीही त्यांना म्हणावे तसे यश मिळाले नाही.
मराठी अस्मितेच्या मुद्दयावरून राज ठाकरेंनी भोंग्यांचा मुद्दा पुढे करीत हिंदुत्वाकडे वाटचाल केली. राज ठाकरे यांच्या मनसेचा मुंबईसोबतच ठाणे, कल्याण डोंबिवली, पुणे, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या जिल्ह्यांत प्रभाव आहे. आणि हीच बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपासून उद्धव ठाकरेंपर्यंत सगळे राज ठाकरेंना टाळी देऊ इच्छितात. मात्र आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर असल्याने त्यांनी मराठीचा मुद्दा पुन्हा हाती घेतल्याचे चित्र दिसत आहे.
राज्य सरकारने हिंदी भाषेबाबत घेतलेल्या निर्णयावर सर्वप्रथम राज ठाकरे यांनीच आवाज उठवला. राज्य सरकारचा हा निर्णय मान्य करणार नाही, आंदोलन करू असा इशाराही दिला. राज्यातील शाळांच्या मुख्याध्यापकांनाही राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीविरोधात भूमिका घेण्यासाठी पत्र पाठवले. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राज यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली आणि मराठी भाषेबाबतची राज्यसरकारची भूमिका त्यांना सांगितली. मात्र राज ठाकरे यांचे समाधान न झाल्याने त्यांनी 5 जुलै रोजी गिरगाव येथे हिंदी भाषा सक्तीविरोधात मोर्चा काढण्याची घोषणा केली. विशेष म्हणजे या मोर्चात त्यांनी पक्षाचा झेंडा नसेल तर मराठी माणूस असेल आणि सगळ्या मराठी माणसांना मोर्चात येण्याचे आवाहन केले आहे.
हुतात्मा चौक येथे पोलिसांवर झालेल्या हल्ल्यानंतर राज ठाकरे यांनी प्रचंड मोठा मोर्चा काढला होता. हिंदी सक्तीविरोधातील त्यांचा हा मोर्चा प्रचंड मोठा असेल यात शंका नाही. त्यांच्या या मोर्चानंतर राज्य सरकार काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिलेले असेल.