Thursday, February 12, 2026 04:11:04 AM

Gaja Marne: कुख्यात गुंड गजा मारणेला न्यायालयाचा दिलासा; दोन दिवस पुण्यात येण्यास परवानगी, पण...

कुख्यात गुंड गजानन ऊर्फ गजा मारणे याला मुंबई उच्च न्यायालयाने केवळ दोन दिवसांसाठी पुण्यात येण्याची परवानगी दिली आहे.

gaja marne कुख्यात गुंड गजा मारणेला न्यायालयाचा दिलासा दोन दिवस पुण्यात येण्यास परवानगी पण

Gaja Marne: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत एक मोठी कायदेशीर घडामोड समोर आली आहे. कुख्यात गुंड गजानन ऊर्फ गजा मारणे याला मुंबई उच्च न्यायालयाने केवळ दोन दिवसांसाठी पुण्यात येण्याची परवानगी दिली आहे. यामुळे मतदानाच्या दिवशी (15 जानेवारी) आणि निकालाच्या दिवशी (16 जानेवारी) मारणेचा मुक्काम पुण्यात असणार आहे, ज्यामुळे पोलीस प्रशासनापुढील डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर महानगरपालिकेची निवडणूक लढवत आहेत. आपल्या पत्नीला निवडणुकीत साहाय्य करण्यासाठी आणि मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मारणेने न्यायालयात धाव घेतली होती. यापूर्वी स्थानिक सत्र न्यायालयाने त्याला शहरात येण्यास मनाई केली होती, मात्र उच्च न्यायालयाने हा निर्णय अंशतः बदलून त्याला 48 तासांचा दिलासा दिला आहे.

हेही वाचा - Mahapalika Election 2026 : प्रचारासाठी कायपण! कार्यकर्त्यांनी चक्क केसात कोरले शिवधनुष्य, Photo Viral

न्यायालयाच्या कडक अटी आणि पोलिसांचा वॉच

उच्च न्यायालयाने मारणेला परवानगी दिली असली, तरी त्यावर कडक अटी लादल्या आहेत. मारणेने मतदारांवर कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा प्रभाव टाकता कामा नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. निवडणुकीच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास हा दिलासा रद्द होऊ शकतो. विशेषतः कोथरूड आणि लगतच्या परिसरात, जिथे मारणेचा प्रभाव आहे, तिथे पोलिसांना 'हाय अलर्ट'वर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - PMC Election : 'मोफत मेट्रो'वरून जुंपली; फडणवीसांची अजित पवारांवर टीका; सुप्रिया सुळेंचे रोखठोक उत्तर

गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि राजकीय खळबळ

दरम्यान, गजा मारणेवर 'मकोका'सारख्या अत्यंत गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. अशा परिस्थितीत, निवडणुकीच्या संवेदनशील काळात त्याच्या पुण्यात येण्याने राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत. मारणेच्या प्रत्येक हालचालीवर पोलीस प्रशासनाची करडी नजर असणार आहे. 


सम्बन्धित सामग्री