Sushil Karad Facebook Post: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख मृत्यू प्रकरणाने पुन्हा एकदा संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड याला सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारत मोठा दणका दिला आहे. मात्र, कायदेशीर लढाईत हार पत्करावी लागल्यानंतर आता कराडचा मुलगा सुशील कराड, याच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
कायदेशीर दारे बंद, अडचणींत वाढ
वाल्मिक कराडने जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयापासून उच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली होती, मात्र तिथे यश आले नाही. अखेर सर्वोच्च न्यायालयानेही गुन्ह्याचे गांभीर्य आणि पुराव्यांची दाहकता लक्षात घेता त्याला दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला. न्यायालयीन प्रक्रियेत सर्व पर्याय संपत असतानाच सुशील कराडच्या इशाऱ्याने प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.
सुशील कराडची 'ती' पोस्ट आणि गौप्यस्फोटाची तयारी
वडिलांचा जामीन अर्ज फेटाळला गेल्यानंतर सुशील कराडने फेसबुकवर एक सूचक पोस्ट केली आहे. "आता सर्वांसमोर सर्व काही बोलणार..." अशा आशयाचा मजकूर त्याने लिहिला असून, यातून तो नेमका कोणता धमाका करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
या पोस्टमुळे हा गौप्यस्फोट संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित असेल की महादेव मुंडे प्रकरणातील काही सुप्त रहस्ये बाहेर येतील? सुशील कराड कोणावर निशाणा साधणार? यामागे तपासाची दिशा बदलण्याचा प्रयत्न आहे की नवीन पुराव्यांची कबुली? असे अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत.
हेही वाचा - NCP Sunetra Pawar Video : "तुमचं बोलून झालं की निघा..." सुनेत्रा पवार यांना न बोलताच पाठवलं, पटेल आणि तटकरेंनी नेमकं काय केलं?
तपास यंत्रणा सतर्क
सुशील कराडच्या या जाहीर इशाऱ्यामुळे केवळ सोशल मीडियावरच चर्चा सुरू आहे असे नाही, तर तपास यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. या पोस्टनंतर प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता असल्याने पोलीस प्रशासन सुशीलच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. एका बाजूला सर्वोच्च न्यायालयाचा कठोर निर्णय आणि दुसऱ्या बाजूला मुलाने दिलेला 'गौप्यस्फोटाचा' इशारा यामुळे आगामी काळात बीडमधील हे हत्याकांड पुन्हा एकदा मोठ्या वादाला तोंड फोडण्याची चिन्हे आहेत.