Dada Bhuse : राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. येत्या 26 जानेवारीला, म्हणजेच 77 व्या प्रजासत्ताक दिनी, महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील विद्यार्थी एकाच वेळी 'देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत' सादर करणार आहेत.
2 कोटींहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित या विशेष उपक्रमात राज्यातील साधारणपणे 2 कोटींपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी होणार आहेत. हा उपक्रम सर्व विभागांच्या, सर्व माध्यमांच्या आणि सर्व भाषिकांच्या शाळांमध्ये एकाच वेळी राबवला जाणार आहे. शासकीय ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर स्थानिक पातळीवर नागरिक, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत ही सामूहिक कवायत सादर केली जाईल.
हेही वाचा - ZP Election 2026 : जिल्हा परिषद निवडणुकीआधीच भाजपाचं खातं उघडलं! कोकणात इतके उमेदवार बिनविरोध विजयी...
विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती आणि स्वयंशिस्त वाढवणार
शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, "या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम आणि राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ होईल. तसेच, यातून विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त, आरोग्याबाबतची जागृती आणि शारीरिक व्यायामाची प्रेरणा मिळेल. शाळांमध्ये कवायतीचे प्रमाण मध्यंतरी कमी झाले होते, मात्र आता या उपक्रमामुळे त्याला पुन्हा चालना मिळेल."
लोकसहभागाचे आवाहन
या ऐतिहासिक उपक्रमाची तयारी गेल्या काही महिन्यांपासून शाळा स्तरावर सुरू आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राज्यातील तमाम नागरिक, संस्था आणि सेवाभावी संस्थांनी सहकार्य करावे आणि या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही शिक्षणमंत्र्यांनी केले आहे.