Parbhani ZP Result: राजकारणात घराणेशाहीला प्राधान्य देणाऱ्या नेत्यांना मतदारांनी यावेळी मोठा धडा शिकवला आहे. परभणी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या कुटुंबाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. एकाच घरातील 5 सदस्यांना वेगवेगळ्या पक्षांतून उमेदवारी मिळूनही, मतदारांनी घराणेशाहीला साफ नाकारत 'धुरळा' चित्रपट शैलीत आपला कौल दिला आहे. सुरेश वरपुडकर यांनी अलीकडेच काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता, मात्र त्यांच्या प्रभावाचा त्यांच्या कुटुंबातील उमेदवारांना कोणताही फायदा झाला नसल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे.
वरपुडकर कुटुंबाचा 'निकाल'नामा
या निवडणुकीत वरपुडकर यांच्या कुटुंबातील जवळपास सर्वच सदस्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. शिंगणापूर जिल्हा परिषद गटातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे त्यांचे पुत्र समशेर वरपुडकर यांचा ठाकरे गटाचे उमेदवार पांडुरंग खिल्लारे यांनी 450 मतांनी पराभव केला. झरी मतदारसंघातून शिवसेना (UBT) कडून रिंगणात असलेल्या त्यांची कन्या सोनल देशमुख यांचा भाजपचे उमेदवार दिलीप देशमुख यांनी पराभव केला. तसेच दैठणा गटातून भाजपच्या तिकिटावर लढणाऱ्या त्यांच्या पत्नी प्रेरणा वरपुडकर आणि लोहगाव गटातून भाजपच्या तिकिटावर लढणारे पुतणे उत्कर्ष वरपुडकर यांनाही पराभवाची धूळ चाखावी लागली. या संपूर्ण कुटुंबात केवळ त्यांचे पुतणे अजित वरपुडकर यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवून कुटुंबाची थोडी प्रतिष्ठा राखली आहे.
हेही वाचा - Maharashtra ZP Election Results 2026 : जिल्हा परिषदेत घराणेशाही! मातब्बर नेत्यांच्या मुलांचा तर कुठे पत्नीचा विजय...जाणून घ्या सविस्तरपणे
पक्षांतर आणि विसंगत राजकारणाचा फटका
सुरेश वरपुडकर यांनी स्वतः भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्य विविध पक्षांच्या तिकिटावर मैदानात उतरले होते, ज्यामुळे मतदारांमध्ये गोंधळाचे आणि नाराजीचे वातावरण होते. सोनल देशमुख यांनी ठाकरे गटात प्रवेश करून उमेदवारी मिळवली होती, तर मुलगा आणि पत्नी भाजपकडून रिंगणात होते. मतदारांनी मात्र कोणत्याही पक्षाच्या चिन्हापेक्षा घराणेशाहीच्या विरोधात मतदान केल्याचे या निकालावरून स्पष्ट होत आहे. परभणी जिल्हा परिषदेच्या एकूण 54 जागांच्या सद्यस्थितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 04, भारतीय जनता पक्ष 03, शिवसेना (UBT) 03, शिवसेना (शिंदे गट) 02 आणि काँग्रेस 02 अशा जागांवर आघाडीवर आहे.