Maharashtra Weather: मे महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातील हवामानाने अचानक पलटी घेतली असून राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस, मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांनी जोरदार हजेरी लावली आहे. कोकण, विदर्भ आणि काही पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये वातावरणात मोठा बदल पाहायला मिळत आहे. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला, तरी दुसरीकडे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
सिंधुदुर्गात पुढील तीन तासांसाठी ऑरेंज अलर्ट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान विभागाने पुढील तीन तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विशेषतः सह्याद्री पट्ट्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सुरू असून वैभववाडी, फोंडा, करूळ, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी परिसरात मुसळधार सरी कोसळत आहेत. ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. किनारपट्टी भागात विजांच्या कडकडाटासह वातावरण अधिकच धोकादायक बनले आहे. काही दिवसांपासून असह्य उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे गारवा जाणवू लागला आहे.
रत्नागिरीतही यलो अलर्ट
रत्नागिरी जिल्ह्यासाठी भारतीय हवामान विभागाने 7 आणि 8 मेसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कोकणात हवामान बदलल्यामुळे तापमानात घट होण्याची शक्यता असून नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळू शकतो. मात्र, विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, तसेच शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी हलवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अमरावतीत केळी पिकांचे मोठे नुकसान
विदर्भातही अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. अमरावती जिल्ह्यातील करजगाव येथे अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. युवा शेतकरी नकुल सावरकर यांच्या सुमारे चार एकर केळी पिकावर या नैसर्गिक संकटाचा गंभीर परिणाम झाला आहे. तोडणीच्या टप्प्यावर आलेली केळीची झाडे वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाली. अनेक घड खाली कोसळल्याने संपूर्ण उत्पादन धोक्यात आले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
यवतमाळमध्ये गारपीटीची भीती
यवतमाळ शहरासह आर्णी, कवठा बाजार, आंबोडा आणि बाबुळगाव भागात दुपारनंतर जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही भागांत गारपीट झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता नव्या संकटाचे सावट निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी बाजार समितीत एका शेतकऱ्याचा गहू पावसात भिजल्याची घटना घडली होती. त्यामुळे शेतमाल संरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
भिवंडीतही वातावरणात अचानक बदल
भिवंडी परिसरात दिवसभर प्रचंड उकाडा जाणवत असताना सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाला. जोरदार वादळी वाऱ्यासह काळे ढग दाटून आले आणि काही काळ अवकाळी पावसासारखी परिस्थिती निर्माण झाली. या बदलामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला.
पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आवाहन
राज्यातील बदलत्या हवामानामुळे पुढील काही दिवस नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. विशेषतः कोकण आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांचा धोका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठेवावा, तर नागरिकांनी विजांच्या वेळी झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत थांबणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.