पंढरपूर: "शुभमंगल सावधान... सावधान..." शब्दांच्या मंगल घोषात आणि सनई चौघड्यांच्या मधुर सुरांनी आज दक्षिण काशी मानली जाणारी पंढरपूर नगरी दुमदुमली आहे. निमित्त आहे ते म्हणजे, वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर पार पडणारा विठ्ठल रुक्मिणी यांचा अलौकिक शाही विवाह सोहळा. या नयनरम्य सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून विठ्ठल भक्तांचा महासागर पंढरपुरात लोटला असून, भक्तीचा हा अभूतपूर्व सोहळा पाहून भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटत आहे.
फुलांचा मखमली साज आणि भक्तीचा सुगंध
विठूरायाच्या या शाही लग्नासाठी मंदिरामध्ये अतिशय देखणी आणि आकर्षक सजावट करण्यात आली आहे. यंदा तब्बल चार ते साडे चार टन विविध रंगीबेरंगी आणि सुवासिक फुलांचा वापर या सजावटीसाठी करण्यात आला आहे. विठ्ठल भक्त भारत दिनी भुजबळ यांनी ही सेवा अर्पण केली असून, सुमारे 100 हून अधिक कर्मचाऱ्यांनी अहोरात्र कष्ट घेऊन मंदिराचे रूपांतर एखाद्या स्वर्गीय प्रांगणात केले आहे. फुलांच्या दरवळात विठ्ठलाचा गाभारा अधिकच तेजोमय दिसत असून, हे रूप डोळ्यांत साठवण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी उसळली आहे.
हेही वाचा: Marathi OTT Platform NAFA Stream : मराठी मनोरंजनाचा समृद्ध खजिना; 'नाफा स्ट्रीम'ची नॉर्थ अमेरिकेत धडाकेबाज एंट्री
विठ्ठल रुक्मिणीचे तेज
लग्नासाठी विठूरायाला एखाद्या राजकुमाराप्रमाणे सजवण्यात आले आहे. देवाच्या मस्तकी रेशमी पगडी, त्यावर डोलणारे मोराचे पीस आणि अंगावर लखलखणारे पारंपरिक सुवर्ण दागिने असा विठ्ठलाचा देखणे रूप लक्ष वेधत आहे. तर दुसरीकडे, माता रुक्मिणीला अत्यंत सुंदर जरीकाठची साडी नेसवून विविध दागिन्यांनी सजवण्यात आले आहे. विठ्ठल रुक्मिणीचे हे तेजोमय रूप पाहून भक्तांच्या ओठावर आपसूकच “रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी” हे अभंग शब्द उमटत आहेत.
मंगलाष्टकांचे सूर आणि अक्षतांचा वर्षाव
काही दिवसांपूर्वीच मकर संक्रांतीच्या दिवशी रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात महिलांनी हळदी कुंकवाचा मान जोपासत अभूतपूर्व गर्दी केली होती. त्या उत्साहाची परिसीमा आज या विवाह सोहळ्याने गाठली आहे. पुरोहितांच्या मंत्रोच्चाराने आणि शास्त्रोक्त पद्धतीने हा विवाह पार पडत असताना, भाविकांनी हातात अक्षता घेऊन या सोहळ्यात सहभाग नोंदवला. सनईच्या सुरांनी आसमंत भारावून गेला असून, प्रत्येक वारकऱ्याला आपण स्वतः विठ्ठलाच्या लग्नाचे वर्हाडी आहोत अशी भावना दाटून आली आहे.
परंपरेचा ठेवा आणि आनंदाचे उधाण
दरवर्षी वसंत पंचमीला पंढरपूरमध्ये हा विवाह सोहळा अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा केला जातो. यंदा देखील लाखो भाविकांच्या उपस्थितीत या सोहळ्याची सांगता होत आहे. लांबून आलेल्या भाविकांसाठी हा क्षण म्हणजे विठूरायाच्या कृपेचा वर्षावच आहे. भक्ती, शक्ती आणि युक्तीचा मिलाफ असलेल्या या सोहळ्याने पंढरपूरच्या आध्यात्मिक वातावरणात चैतन्य निर्माण केले असून, भक्तांचा आनंद आज खरोखरच गगनात मावेनासा झाला आहे.
हेही वाचा: Vikas Gogawale : महाडमधलं मारहाण प्रकरण, विकास गोगावले अखेर पोलिसांना शरण