Saturday, March 07, 2026 03:06:59 AM

Panvel Karjat Local Train: प्रवाशांसाठी 'गुड न्यूज'; प्रवासाचा अर्धा तास वाचणार; पनवेल-कर्जत थेट लोकलला हिरवा कंदील, धावणार 'विकासाची एक्सप्रेस'

एमआरव्हीसीच्या या प्रकल्पामुळे नवी मुंबई कनेक्टिव्हिटी आणि औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

panvel karjat local train प्रवाशांसाठी गुड न्यूज प्रवासाचा अर्धा तास वाचणार पनवेल-कर्जत थेट लोकलला हिरवा कंदील धावणार विकासाची एक्सप्रेस

मुंबईची 'लाईफलाईन' समजली जाणारी उपनगरीय रेल्वे आता आणखी विस्तारत असून, रोजच्या धकाधकीतून जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. "प्रवासाचा थकवा आणि वेळेचा अपव्यय" ही मुंबईकरांची नेहमीचीच डोकेदुखी, मात्र आता यावर कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे. मध्य रेल्वेची दोन अतिंम टोके, हार्बर मार्गावरील पनवेल आणि मुख्य मार्गावरील कर्जत आता थेट जोडली जाणार आहेत. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्पांतर्गत 'एमआरव्हीसी'च्या माध्यमातून साकारत असलेल्या या नव्या कॉरिडॉरमुळे केवळ भौगोलिक अंतरच कमी होणार नाही, तर या परिसराच्या विकासाला एक नवी गती मिळणार आहे.

सध्याच्या घडीला कर्जतवरून पनवेलला जायचे म्हटल्यास प्रवाशांना ठाणे गाठून ट्रान्स-हार्बरने वळसा घालून यावे लागते. तसेच, सीएसएमटी ते कर्जत हा प्रवास सध्या धीम्या लोकलने अडीच तास आणि जलद लोकलने तब्बल दोन तासांचा आहे. मात्र, 29.6 किलोमीटर लांबीच्या पनवेल-कर्जत दुहेरी मार्गिकेमुळे हे चित्र पूर्णपणे पालटणार आहे. आता नव्या मार्गावरून पनवेलमार्गे प्रवास केल्यास अवघ्या एक तास 45 मिनिटांत इच्छित स्थळी पोहोचता येईल. म्हणजेच, प्रवाशांची तब्बल 30 मिनिटांची मोठी बचत होणार असून, प्रवासाचा ताणही लक्षणीयरीत्या हलका होईल.

या महाप्रकल्पाचे सर्वांत मोठे आणि लक्षवेधी वैशिष्ट्य म्हणजे या मार्गावर साकारत असलेले महाकाय बोगदे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुरेख संगम. तब्बल 2,639 मीटर लांबीचा 'वावर्ले' येथील बोगदा आता मुंबई महानगरातील उपनगरीय रेल्वेचा सर्वाधिक लांबीचा बोगदा ठरला आहे.

या बोगद्याने ठाणे-दिवा दरम्यानच्या 1.6 किलोमीटर लांबीच्या पारसिक बोगद्याचाही विक्रम मोडीत काढला आहे. याशिवाय नाधल (234 मीटर) आणि किरावली (333 मीटर) असे एकूण तीन बोगदे या मार्गावर उभारले गेले आहेत. विशेष म्हणजे, यात खडी नसलेले (बॅलास्टलेस) काँक्रीट ट्रॅक आणि अत्याधुनिक 'स्काडा' (SCADA) सिस्टीम बसवण्यात आली आहे.

हेही वाचा: PM Narendra Modi Instagram: इन्स्टाग्रामवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू; 10 कोटी फॉलोअर्सचा टप्पा पार

कोरोना काळात आलेले अनेक अडथळे पार करत या प्रकल्पाने आता तब्बल 85 टक्के कामाचा टप्पा गाठला आहे. उर्वरित 15 टक्के काम आगामी दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे युद्धपातळीवरील नियोजन 'एमआरव्हीसी'ने आखले आहे. या मार्गावर पनवेल, चिखले, पोयंजे, चौक आणि कर्जत अशी पाच आधुनिक आणि प्रवासी-केंद्रीत स्थानके असणार आहेत.

हा रेल्वे कॉरिडॉर म्हणजे केवळ दोन स्थानकांना जोडणारा मार्ग नसून, तो नवी मुंबई आणि परिसराच्या आर्थिक विकासाचा खऱ्या अर्थाने 'गेमचेंजर' ठरणार आहे. तळोजा एमआयडीसीसारख्या औद्योगिक क्षेत्रांना या कनेक्टिव्हिटीचा मोठा फायदा होईल. तसेच, प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचण्यासाठी प्रवाशांना एक नवा आणि सोपा पर्याय उपलब्ध होईल.

अभियांत्रिकीचा उत्तम नमुना असलेल्या या प्रकल्पात 47 लहान-मोठे पूल, पनवेल-कर्जत जंक्शनवरील दोन उड्डाणपूल, पाच रोड ओव्हरब्रिज आणि पुणे एक्सप्रेसवेच्या खालून जाणाऱ्या महत्त्वाच्या अंडरपाससह 15 रस्ते अंडरब्रिज उभारण्यात आले आहेत. प्रगत सिग्नलिंग आणि इंटरलॉकिंग सिस्टीममुळे प्रवाशांची सुरक्षा अधिक भक्कम करण्यात आली आहे.

रस्त्यांवरील वाहतूक कोंडी फुटेल, खासगी वाहनांचा वापर कमी होऊन पर्यावरणातील कार्बन उत्सर्जन घटेल आणि वस्तू व कामगारांची ने-आण अत्यंत सुलभ होईल. एकंदरीतच, पनवेल-कर्जत रेल्वे प्रकल्प हा केवळ प्रवासाचा वेळ वाचवणारा नाही, तर मुंबईच्या उपनगरांमध्ये समृद्धीची आणि औद्योगिक भरभराटीची नवी पहाट घेऊन येणारा महामार्ग ठरणार आहे.

हेही वाचा: Share Market Today: आज एकाच झटक्यात मार्केट वधारलं; परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय शेअर बाजारावर मोठा डाव, सेन्सेक्स आणि निफ्टी...


सम्बन्धित सामग्री