Akola News: अकोला शहरात वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवण्याच्या घटना ताज्या असतानाच, पालकांच्या बेजबाबदारपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकोल्यातील वर्दळीच्या रस्त्यावर एका अल्पवयीन मुलाच्या हाती दुचाकी सोपवून पालकांनी त्याच्या आणि इतरांच्या जीवाशी खेळ मांडल्याचे पाहायला मिळत आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
भररस्त्यात चिमुरड्याचा 'स्टंट'
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका मुख्य रस्त्यावर हा प्रकार घडला. ज्या वयात मुलांनी सायकल चालवणे अपेक्षित असते, त्या वयात हा मुलगा क्षमतेपेक्षा मोठी बाईक वेगाने चालवताना दिसला. विशेष म्हणजे, अशा वेळी पालकांनी त्याला रोखण्याऐवजी त्याच्याकडे दुचाकीचं हँडल सोपवलं. ही दुचाकी अनियंत्रित झाली असती, तर मोठा अपघात घडू शकला असता.
पालकांवर कारवाईची मागणी
वाहतूक नियमांनुसार, 18 वर्षांखालील मुलांच्या हाती वाहन देणे हा गंभीर गुन्हा आहे. अशा प्रकरणांमध्ये केवळ मुलावरच नाही, तर वाहन मालकावर आणि पालकांवरही कडक कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे. 'अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन देणे म्हणजे त्यांना मृत्यूच्या दारात ढकलण्यासारखे आहे,' अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
हेही वाचा - Jalgaon Viral Video : खेळता खेळता चिमुरड्याचं डोकं अडकलं ॲल्युमिनियमच्या भांड्यात; तासाभराच्या थरारानंतर..., पाहा व्हायरल व्हिडिओ
अपघातांला निमंत्रण
अकोला पोलीस प्रशासनाकडून वारंवार जनजागृती करूनही अनेक पालक आपल्या पाल्यांना दुचाकी किंवा चारचाकी चालवण्यास देतात. अशा बेजबाबदारपणामुळे निष्पाप लोकांचा बळी जातो. या घटनेनंतर आता अकोला वाहतूक पोलीस संबंधित वाहन मालकाचा शोध घेऊन काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.