Madanpura Building Collapse: मुंबईत पुन्हा एकदा इमारत कोसळल्याची घटना समोर आली आहे. मदनपुरा परिसरातील फनुसवाला इमारतीचा एक भाग बुधवारी दुपारी कोसळला, ज्यामध्ये सात जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले, त्यानंतर अग्निशमन दल आणि महापालिकेच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली.
प्राप्त माहितीनुसार, ही दुर्घटना बुधवारी दुपारी सुमारे 12:45 वाजता घडली. ग्राउंड प्लस वन मजली फनुसवाला इमारतीच्या पहिल्या मजल्याचा काही भाग अचानक कोसळला, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आले. महापालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, कोसळलेल्या भागाखाली काही लोक अडकले असावेत अशी माहिती मिळताच, फायर ब्रिगेड, पोलीस आणि स्थानिक वॉर्ड टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर बचाव कार्याला तात्काळ सुरुवात करण्यात आली.
हेही वाचा - Maharashtra Government: महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या कामकाजावर नजर; परफॉर्मन्स ऑडिटमुळे मंत्रिमंडळात वाढला तणाव, पाहा काय आहे कारण
सात जण जखमी
या दुर्घटनेत गुलाम रसूल (24) आणि मोहम्मद सय्यद (59) हे गंभीर जखमी झाले असून, दोघांनाही महापालिकेच्या नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, दोघांची प्रकृती सध्या स्थिर आहे. तर आरिफ (29), सत्तार (35), मोहम्मद (35), समसुल (29) आणि कॅथरीन (45) या पाच जणांना भाटिया रुग्णालयात ओपीडी पद्धतीने उपचार देऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
हेही वाचा - Malad Society Horror: मालाडमध्ये सोसायटी कॉम्प्लेक्समध्ये खेळताना 7 वर्षांच्या मुलाला कारने चिरडले; महिला चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
दरम्यान, बीएमसीच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले की, इमारत जुनी असून तिच्या संरचनेचा तपास करण्यात येत आहे. स्ट्रक्चरल इंजिनियरिंग टीम घटनास्थळी दाखल झाली असून, कोसळलेल्या भागाचा सविस्तर अहवाल तयार केला जात आहे. घटनेचा सीसीटीव्ही आणि मोबाईल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये इमारतीचा काही भाग अचानक खाली कोसळतानाचे दृश्य दिसते. स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, ही इमारत दीर्घकाळापासून जीर्ण अवस्थेत होती आणि दुरुस्तीची गरज होती.
अग्निशमन दल आणि बीएमसी अधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की, पावसाळ्यापूर्वी जीर्ण इमारतींची तपासणी करून रहिवाशांनी खबरदारी घ्यावी. या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली असून, इमारतीचा उर्वरित भाग कोसळण्याचा धोका कायम आहे.