Wednesday, February 18, 2026 05:27:42 PM

Deputy CM Sunetra Pawar : पंतप्रधान मोदींनी सुनेत्रा पवार यांच्यावर व्यक्त केला विश्वास; शपथ घेताच पोस्ट करत म्हणाले, 'अजितदादांचे स्वप्न..'

सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर पोस्ट करत त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आणि त्यांना पुढील काळासाठी शुभेच्छा दिल्या.

deputy cm sunetra pawar  पंतप्रधान मोदींनी सुनेत्रा पवार यांच्यावर व्यक्त केला विश्वास शपथ घेताच पोस्ट करत म्हणाले अजितदादांचे स्वप्न

Sunetra Pawar takes Oath as Deputy CM : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी स्वीकारली आहे. यानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्ट करत सुनेत्रा पवार यांना विशेष शुभेच्छा दिल्या आहेत. यासह महाराष्ट्राच्या इतिहासात एका मोठ्या घटनेची नोंद झाली आहे.

पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छा
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर पोस्ट करत त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. "महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून नवीन जबाबदारी स्वीकारणाऱ्या सुनेत्रा पवारजी यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी पूर्ण निष्ठेने काम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न यशस्वीपणे पुढे नेतील, याची मला खात्री आहे," अशा शब्दांत पंतप्रधानांनी मराठी भाषेत शुभेच्छा देत आपला विश्वास व्यक्त केला.

लोकभवन येथे साध्या पद्धतीने शपथविधी
शनिवारी, 31 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी 05:00 वाजता मुंबईतील 'लोकभवन' येथे हा शपथविधी सोहळा पार पडला. अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यात आणि पवार कुटुंबात दुःखाची सावली असल्याने हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने पार पडला. कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना या सोहळ्यासाठी फुले किंवा पुष्पगुच्छ न आणण्याच्या सूचना प्रशासनाकडून आधीच देण्यात आल्या होत्या. केवळ 10 ते 15 मिनिटांच्या या औपचारिक सोहळ्यात सुनेत्रा पवार यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

हेही वाचा - Rohit Pawar Tweet: ‘अजितदादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही’; सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर रोहित पवारांचे ‘ते’ ट्वीट चर्चेत

अजित पवारांचा वारसा आणि सुनेत्रा पवारांची खंबीर साथ
अजित पवारांच्या अकाली निधनानंतर पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर मोठे संकट उभे राहिले होते. त्यांचे दोन्ही पुत्र राजकारणात अद्याप नवखे असल्याने पक्षाची धुरा सांभाळण्यासाठी सुनेत्रा पवार यांना राजी करण्यात आले. त्या स्वतः एक खंबीर व्यक्तिमत्त्व असून बारामती लोकसभा मतदारसंघात आणि विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी आपली कामाची छाप पाडली आहे. तसेच, त्या माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी असल्याने त्यांना राजकारणाचे धडे माहेरूनच मिळाले आहेत.

पक्षापुढील आव्हाने आणि सुनेत्रा पवारांची भूमिका
येत्या काळात जिल्हा परिषद निवडणुका संपल्या असल्या तरी, लोकसभा निवडणुकीपर्यंत पक्षाची विखुरलेली घडी पुन्हा बसवणे हे सुनेत्रा पवार यांच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान असेल. महायुती सरकारमध्ये आपला दबदबा कायम राखत अजितदादांनी सुरू केलेली विकासकामे मार्गी लावण्याची मोठी जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर आली आहे.

हेही वाचा - Sunetra Pawar DCM Of Maharashtra : सुनेत्रा पवार यांनी घेतली महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ; बनल्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री


सम्बन्धित सामग्री