Friday, February 13, 2026 12:58:09 AM

Ajit Pawar : पुणे-पिंपरीतील पराभवानंतरअजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट; निकालाच्या दुसऱ्याच दिवशी दोन्ही राष्ट्रवादीत मोठी खलबतं

पुण्यातील पराभवाच्या अवघ्या 24 तासांतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत शरद पवार यांच्या 'गोविंदबाग' निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.

ajit pawar  पुणे-पिंपरीतील पराभवानंतरअजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट निकालाच्या दुसऱ्याच दिवशी दोन्ही राष्ट्रवादीत मोठी खलबतं

Ajit Pawar meets Sharad Pawar : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांच्या (PMC & PCMC Election 2026) निकालांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊनही भाजपने या दोन्ही शहरांत निर्विवाद वर्चस्व मिळवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या दारूण पराभवाच्या अवघ्या 24 तासांतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत शरद पवार यांच्या 'गोविंदबाग' निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीमुळे "पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का?" अशा चर्चांना उधाण आले आहे.

राजकीय भूकंप की कौटुंबिक भेट? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
महानगरपालिकांच्या निकालात दोन्ही राष्ट्रवादीचा 'सुपडा साफ' झाल्यानंतर झालेल्या या भेटीबाबत अजित पवारांनी पत्रकार परिषदेत सविस्तर स्पष्टीकरण दिले. "आज बारामतीत 'कृषिक 2026' या भव्य कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन होते. मी या भागाचा लोकप्रतिनिधी असल्याने तिथे जाणारच होतो. पण मला समजलं की साहेब (शरद पवार) आधीच तिथे पोहोचले आहेत, म्हणून आम्ही एकत्र जाण्याचे ठरवले," असे अजित पवार म्हणाले. ही भेट केवळ कार्यक्रमासाठी एकत्रित जाण्यासाठी होती, कोणताही राजकीय गट तयार करण्यासाठी नव्हती, असा दावा त्यांनी केला आहे.

पुणे-पिंपरीत 'कमळ' फुललं; दोन्ही राष्ट्रवादीच्या एकीचा प्रयोग फसला
यंदाच्या निवडणुकीत पुणे महापालिकेच्या 165 जागांपैकी भाजपने 116 जागा जिंकत आपला गड अधिक मजबूत केला आहे. याउलट, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 21 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 3 जागांवर समाधान मानावे लागले. पिंपरी-चिंचवडमध्ये तर शरद पवार गटाला खातेही उघडता आले नाही, तर भाजपने 84 जागांसह एकहाती सत्ता मिळवली. 2017 नंतर पुन्हा एकदा दोन्ही पवारांची ताकद एकत्रित येऊनही मतदारांनी भाजपच्या 'विकास' पॅटर्नलाच पसंती दिल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

हेही वाचा - Pune Election Results: स्वबळाची खुमखुमी नडली, पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेचा करेक्ट कार्यक्रम; 'या' कारणांमुळे स्वीकारावा लागला पराभव

जिल्हा परिषद निवडणुकांसाठी नवी रणनीती?
महापालिकेत जरी पराभव झाला असला तरी, आगामी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा हातमिळवणी करणार का? या प्रश्नावर अजित पवारांनी सूचक विधान केले. "शशिकांत शिंदे यांनी काय विधान केलंय याची मला माहिती नाही. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही स्थानिक पदाधिकाऱ्यांना युतीचे अधिकार दिलेले असतात," असे ते म्हणाले. सध्या महायुतीत काम करत असल्याचे सांगून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असली तरी, भविष्यात ग्रामीण भागातील सत्तेसाठी दोन्ही पवार गट एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अदानींचा दौरा आणि कौटुंबिक एकजूट
काही दिवसांपूर्वीच उद्योगपती गौतम अदानी यांनी बारामतीत 'विद्या प्रतिष्ठान'च्या एआय (AI) इमारतीचे उद्घाटन केले होते. या कार्यक्रमात संपूर्ण पवार कुटुंब एकाच मंचावर दिसले होते. "आम्ही परिवार म्हणून आजही एक आहोत, सुख-दु:खात आम्ही एकत्र असतोच," असे भावनिक विधानही अजित पवारांनी यावेळी केले. जनतेचा कौल सर्वोच्च असून तो पूर्ण आदराने स्वीकारत असल्याचे सांगत, पराभवानंतर खचून न जाता दुप्पट जोमाने काम करणार असल्याची खात्री त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिली आहे.

हेही वाचा - NMMC election Result 2026: नवी मुंबईत भाजपची ऐतिहासिक मुसंडी! 65 जागांसह एकहाती सत्ता, वॉर्डनिहाय विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी


सम्बन्धित सामग्री